- पोलिसांकडून बळाचा वापर करीत लाठीचार्ज…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ मार्च २०२२) :- राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रविवारी पिंपरी चिंचवड शहरात विकासकामांचं उद्घाटन केलं. यावेळी भाजप आणि राष्ट्रवादी कार्यकर्ते आमने – सामने आल्याने गोंधळ झाला होता. त्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाल्याने पोलिसांनी बळाचा वापर करत लाठीचार्ज केला. या वादामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
पूर्णानगर येथील अटलबिहारी वाचपेयी उद्यानाचे काम अर्धवट असूनही उद्घाटन करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला. निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी सुरू केली. प्रत्युत्तर म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांनीही घोषणाबाजी सुरू केली. यामुळे येथील परिस्थिती चिघळली होती.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी घोषणाबाजी केली. यावेळी फडणवीस यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर चपला आणि बांगड्या फेकण्याची घटना घडली आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करीत असून वातावरण तणावपूर्ण झाल्याने येथील पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
















