- अधिकाऱ्यांकडून मात्र भलताच खुलासा…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ मार्च २०२२) :- बहुचर्चित पिंपरी ते फुगेवाडी मेट्रोचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी (दि. ६) ऑनलाइन लोकार्पण झाले. गरवारे कॉलेज ते वनाज या मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रत्यक्ष आणि पिंपरी चिंचवडमधील फुगेवाडी या मार्गाचे रविवारी ऑनलाइन लोकार्पण झाले. या कार्यक्रमाची थेट चित्रण पाहण्याची व्यवस्था पीसीएमसी स्थानकावर केली होती.
पंतप्रधान मोदी यांनी ऑनलाइन लोकार्पण केल्यानंतर पीसीएमसी ते फुगेवाड़ी दरम्यान मेट्रो धावली. पीसीएमसी स्थानक व मेट्रोला फुलांच्या माळांनी सजवले होते, राष्ट्राची धून लावली होती. उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
दरम्यान महापालिका पदाधिकारी अधिकाऱ्यांसह काही नागरिकांनी पिंपरी ते फुगेवाडी आणि फुगेवाडी ते पिंपरीपर्यंत प्रवास केला. पिंपरी ते फुगेवाडी दरम्यान धावलेल्या मेट्रोच्या एक क्रमांकाच्या कोचच्या उजव्या बाजूकडील दोन खिडक्यांच्या काचांना तडे गेल्याचे आढळून आले. याबाबत काहींनी लोकप्रतिनिधी व मेट्रोच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. पण, त्या खिडक्यांच्या काचा तडकलेल्या नसून ती डिझाईन असल्याचे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
















