- स्मार्ट पिंपळे निलख संकल्पनेतील पहिला स्मार्ट प्रकल्प पूर्ण – विनायक गायकवाड…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ मार्च २०२२) :- पिंपळे निलख परिसरातील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेले शहीद अशोक कामटे उद्यानाचा शुभारंभ मा.मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते मा.ना.देवेंद्रजी फडणवीस, श्रीमती. वीणा अशोक कामटे, आमदार लक्ष्मणभाऊ जगताप, आमदार महेशदादा लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी महापौर सौ.माई ढोरे, पक्षनेते नामदेव ढाके, नगरसेवक, नगरसेविका उपस्तिथ होते.
४ एकर क्षेत्र परिसरामध्ये असलेले हे उद्यान अनेक नवनवीन सुविधायुक्त आहे. यामध्ये लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विरंगुळा करीत अनेक संकल्पना राबविलेल्या आहेत. त्याचप्रमाणे विविध प्रकारची सुशोभित झाडे त्याठिकाणच्या सौंदर्यात भर घालत आहेत. यामध्ये लहान मुलांसाठी खेळाचे मैदान, नागरिकांना चालण्याकरिता ट्रॅक, बसण्याकरिता सुसज्ज व्यवस्था, सौंदर्याच्या अनुषंगाने परगोला, गझीबो, कार्यक्रमाचा स्टेज व अँम्फीथिएटर अशा अनेक स्मार्ट संकल्पना राबविलेल्या आहेत.
नगरसेविका ममता विनायक गायकवाड म्हणाल्या कि, “स्मार्ट पिंपळे निलख संकल्पना अंतर्गत हा परिसर स्मार्ट बनविण्याकरिता सर्वप्रथम आम्ही ह्या स्मार्ट शहीद अशोक कामटे उद्यानाची संकल्पना मांडली. त्या दृष्टीने महानगरपालिकेकडे पाठपुरावा करून स्थायी समिती अध्यक्षा असताना २०१९ साली मंजूर करून काम चालू केले. आज हे उद्यान या शहराच्या सौंदर्यात भर घालत आहे.आमच्या स्मार्ट प्रभागाच्या संकल्पनेतील हे उद्यान हे उत्तम उदाहरण आहे.”
विनायक गायकवाड म्हणाले “मी स्वतः पोलीस पुत्र आहे आणि पोलीस दलाविषयी माझ्या मनात आदराची भावना आहे व त्याच भावनेतून शहीद अशोक कामटे यांचे नाव मी या उद्यानासाठी दिले आणि याच कृतीतून शहीद अशोक कामटे व पोलीस दलाचा मान ठेवण्याचा मी प्रयत्न केला. बाकी स्मार्ट व मॉडेल प्रभाग बनविण्याचे आमचे विकासकामांचे उदिष्ठ नागरिकांसमोर मांडले आणि नागरिकांनी देखील त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्यातूनच साकारलेले हे उद्यान आपण सर्वजण आज पाहत व अनुभवत आहोत त्याबद्दल मी नागरिकांचे देखील मनःपूर्वक आभार मानतो ”
















