- देवेद्र फडणवीस यांचा पिंपरीत विरोधकांना चिमटा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ मार्च २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध विकास कामांचे उद्घाटन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी झाले. या वेळी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षनेत्यांच्या वाहनांवर चपला फेकल्या. महिलांनी बांगड्या भिरकाविल्या. या आंदोलना वर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ जनता आपले काम बघत आहे. कुणी काळे, पिवळे, निळे कोणतेही झेंडे घेतले तरी काही फरक पडत नाही. त्यांची दुकाने बंद झाली आहेत हे खरे आहे”.
महापालिकेत भाजप सत्तेत आल्यानंतर झालेला विकास लोकांनी बघितला आहे. एखादे चांगले काम करा आणि श्रेय घ्या. पण विरोधकांना काम करायचंच नाही आणि श्रेय घ्यायचं आहे. ईश्वर त्यांना सुबुद्धी देवो. आम्ही पाच वर्षे प्रामाणिकपणे काम केले आहे. आता वॉर्डबदल करा अगर वाटेल ते करा, जनता बघत आहे, अनुभव घेत आहे.
आमदार महेश लांडगे म्हणाले, “आपली जुनी माणसं म्हणतात, ओरडतात ते चावत नाहीत. दुसऱ्या म्हणीनुसार आता जनता म्हणते की, ‘ काम दाखवा तरच मत मागायला या’ त्यामुळे केवळ आरोप करण्यापलीकडे विरोधक काहीही करू शकत नाही.
एकनाथ पवार म्हणाले, ” चांगल्या कार्यक्रमावेळी आंदोलन करणे, यावरून विरोधकांची मनोवृत्ती दिसून येते. या प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो.”
















