- शहरातील चार लाख प्रवाश्यांना सोडले वाऱ्यावर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ मार्च २०२२) :- देशाचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोचे उदघाटन झाले. प्रकल्प नियोजित करत असताना पिंपरी चिंचवड शहराला मात्र दुय्यम भूमिकेत आखले गेले. निगडी, प्राधिकरण, आकुर्डी, चिखली, तळवडे, रुपीनगर,यमुनानगर, ट्रान्सपोर्ट नगर, चिंचवड, वाल्हेकरवाडी, रावेत, विकासनगर, देहूरोड या परिसरातून दरोरोज शिवाजीनगर व पुणे येथे कामानिमित्त प्रवास करणाऱ्या ४ लाख प्रवाश्यांचा विचार केला गेला नाही.
अगदी सुरुवातीपासूनच नागरिकांची निगडीपासून मेट्रो तयार व्हावी अशी मागणी असतानाही व त्याबाबत वेळोवेळी पाठपुरावा असूनही या मागणीला सद्यस्थितीला पूर्णविराम दिला गेला. त्यामुळे उपनगरातील हजारो कुटुंबियांना मेट्रोपासून वंचित रहावे लागणार आहे. निगडी ते शिवाजीनगर, पुणे येथे दरोरोज हजारो चाकरमानी कामगार हे प्रवास करत असतात. निगडीच्या आसपासच्या उपनगरातून प्रवास करण्यासाठी सकाळी ६.०० पासूनच सुरुवात होते. निगडी ते पिंपरी, पुन्हा पिंपरी ते फुगेवाडी, व पुन्हा फुगेवाडी ते पुणे अश्या तीन टप्प्यात प्रवास करावा लागेल, हे व्यवहारिक ठरत नाही. नागरिक असा प्रवास करणार नाहीत.
शहरातील राजकीय मंडळींनी डीपीआरची अंमलबजावणी तातडीने करून निगडीपर्यंत मेट्रो नेणे क्रमप्राप्त ठरते. असे केले नाही तर मात्र, पिंपरी ते फुगेवाडी मेट्रो ही केवळ निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून केलेली राजकीय खेळीच असेल, हे अर्धसत्य मात्र नक्की.
– विजय पाटील – अध्यक्ष प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती…


















