न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ मार्च २०२२) :- पूर्णानगर येथे श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी पर्यटन केंद्राचे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन होते. या घटनेत कार्यक्रमाच्या ठिकाणी राष्ट्रवादी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांची शाब्दिक चकमक झाली. दोन्ही पक्षातील लोक आक्रमक होऊन एकमेकांच्या अंगावर धावून गेले. दुसऱ्या घटनेत काॅंग्रेस पदाधिकारी व कार्येकर्त्यांनी चिंचवड येथे बेकायदेशीर जमाव जमवून काळे झेंडे दाखविले. अशा दोन्ही प्रकरणात विविध पक्षांच्या ५४ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड शहरात पोलीस आयुक्तांनी जमावबंदीचे आदेश दिले आहेत. असे असतानाही राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी जमाव जमविला. पोलीस उपनिरीक्षक सचिन पंडीत देशमुख यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कुशाग्रह अशोक कदम (रा. संभाजीनगर, चिंचवड) आणि राष्ट्रवादीचे १५ कार्यकर्ते तसेच मोतीराम रावसाहेब पवार (रा. पूर्णानगर, चिंचवड) आणि भाजपचे १५ कार्यकर्ते अशा दोन्ही पक्षातील ३० जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.
माथाडी नेते आण्णासाहेब पाटील यांच्या स्मारकाचे दसरा चौक, चिंचवड येथे उद्घाटन रविवारी (दि. ६) झाले. त्यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कार्यक्रमास्थळी आले असता काॅंग्रेस पदाधिकारी व कार्येकर्त्यांनी बेकायदेशीर जमाव केला. रहदारीचा रस्ता अडवून काळे झेंडे दाखवून घोषणा दिल्या. मास्क न लावता, फिजिकल डिस्टंन्सिंगचे पालन न करता निदर्शने केली. शासकीय परवानगी न घेता निदर्शने केली. सहायक फौजदार दादाराम जाधव यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. काॅंग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष कैलास कदम (वय ५०), महिला शहराध्यक्ष सायली नढे (वय ३०) व त्यांचे इतर कार्यकर्ते यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
















