न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ मार्च २०२२) :- जागतिक महिला दिनानिमित्त उद्या मंगळवारी भाजपा पिंपरी-चिंचवडच्या वतीने शहरातील महिलांना संपूर्ण दिवस पिंपरी ते फुगेवाडी व परतीची मेट्रो सफर करण्याची मोफत संधी उपलब्ध करुन येणार आहे. मेट्रोची पहिली सफर सकाळी साडेसात वाजता सुरु करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती महापौर उषा ढोरे यांनी दिली.
या सफरमध्ये शहराध्यक्ष महेश लांडगे, आमदार लक्ष्मणभाऊ जगताप, उपमहापौर हिराबाई घुले, स्थायी समिती सभापती ॲड. नितीन लांडगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके नगरसेवक/नगरसेविका प्रवास करणार आहेत.
महापौर ढोरे म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते रविवारी पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील पिंपरी ते फुगेवाडी मेट्रोचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा पार पडलेला आहे. पिंपरी-चिंचवडकरांच्या सेवेत मेट्रो दाखल झालेली आहे. शहरातील नागरिकांना मेट्रोप्रवास हा कुतूहलाचा विषय झालेला आहे.
शहरामध्ये कोविड संक्रमणाच्या काळापासून ते आजतागायत पिंपरी चिंचवड शहरातील महापालिकेच्या तसेच खाजगी रुग्णालयातील रुग्णालयीन व इतर फ्रंटलाईन महिला कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून रुग्णसेवा देवुन योगदान देत आहेत. अशा सर्व रुग्णालयीन महिला कर्मचारी जसे की, स्वच्छता कर्मचारी, डॉक्टर्स, नर्सेस, वार्ड आया, पॅरामेडीकल स्टाफ, फ्रंटलाईन महिला कर्मचारी व महिला पोलीस कर्मचारी यांना तसेच शहरातील ज्या महिला मेट्रो प्रवासासाठी इच्छुक आहेत अशा सर्व महिलांना मंगळवार जागतिक महिला दिनानिमित्त भाजपा पिंपरी-चिंचवडच्या वतीने संपुर्ण दिवस पिंपरी ते फुगेवाडी व परतीची मेट्रो सफर करण्याची मोफत संधी उपलब्ध करुन येणार आहे.
सकाळी साडेसात वाजता मेट्रोची पहिली सफर पिंपरी स्थानक ते फुगेवाडी ते परत पिंपरी अशी होणार आहे. यानंतर दर अर्ध्या तासांनी एक फेरी याप्रमाणे रात्री नऊ वाजेपर्यंत दिवसभर शहरातील महिलांना मोफत मेट्रो सफर करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. शहरातील सर्व फ्रंटलाईन महिला कर्मचारी व इतर जास्तीत जास्त महिलांनी मेट्रो सफरचा अनुभव घ्यावा असे आवाहन सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केले.


















