न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ मार्च २०२२) :- शहरातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांमुळे व नागरिकांमुळे महापालिकेच्या नावलौकिकात भर पडली असल्याचे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शहरातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणा-या महिलांचा व नागरिकांचा सत्कार महापौर माई ढोरे यांच्या हस्ते महापौर दालनात करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या.

सत्कार प्रसंगी जैव विविधता व्यवस्थापन समिती सभापती उषा मुंडे, नगरसदस्य बाबासाहेब त्रिभुवन, नगरसदस्या मनिषा पवार, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.
सत्कारार्थीमध्ये महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे कार्यरत असलेल्या तसेच संगीत, कोरोना योद्धा, हिरकणी पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्त्या स्मिता जोशी, संध्या ननवरे, मनिषा साळुंखे, बाळासाहेब साळुंखे, प्रणव कांबळे, दिपचंद भाट कॉसमॉस बँकेच्या असिस्ट॑ट जनरल मॅनेजर भावना देव, सामाजिक कार्यकर्त्या कविता तिटकारे यांचा महापौर माई ढोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
दरम्यान जागतिक महिला दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे १० वर्षे पूर्ण झालेल्या १०० महिला बचत गटांना महापौरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी स्थायी समिती सभापती अॅड. नितिन लांडगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त राजेश पाटील, शहर सुधारणा समिती सभापती अनुराधा गोरखे, महिला व बालकल्याण समिती सभापती सविता खुळे, नगरसदस्या स्वाती उर्फ माई काटे अनुराधा गोफणे, निर्मला गायकवाड, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उप आयुक्त अजय चारठाणकर, सहाय्यक आयुक्त रविकिरण घोडके, विविध महिला बचत गटांचे पदाधिकारी उपस्थित होते.
महिलांमध्ये कौशल्ये विकसीत करून महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या नागरवस्ती विभागा मार्फत विविध योजना राबवल्या जात आहेत. अशा कल्याणकारी योजनांचा शहरातील महिलांनी लाभ घ्यावा, असे महापौर माई ढोरे म्हणाल्या.


















