- राज्य शासनाचा एसआरए प्राधिकरणाला आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मार्च २०२२) :- पुणे आणि पिंपरी – चिंचवड झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणांतर्गत येणाऱ्या (एसआरए) झोपडपट्टी पुनर्वसन योजनांमधील झोपडपट्टी धारकाना ३०० चौरस फुटाची सदनिका मिळणार आहे. राज्य शासनाने यासंबंधीचा निर्णय घेतला असून, त्यासंबंधीची कार्यवाही करण्याचे आदेश एसआरए प्राधिकरणाला दिले आहेत.
पुणे आणि पिंपरी – चिंचवड शहरात सहाशेहून अधिक झोपडपट्ट्या असून पुणे शहरातील ४० टक्क्यापेक्षा अधिक लोकसंख्या झोपडपट्टीत राहते. या झोपड पट्ट्यांचे पुनर्वसन होऊन झोपडपट्टीवासीयांना हक्काचे घर मिळावे यासाठी राज्य शासनाने एसआरए स्वतंत्र प्राधिकरण स्थापन केले आहे. एसआरएतील तरतुदीनुसार झोपडपट्टीधारकांना २७० फुटांचे घर दिले जात होते. मात्र, मुंबईच्या धर्तीवर पुण्यातही झोपडपट्टीधारकांना ३०० चौरस फुटांचे घर मिळावे, अशी मागणी झोपडपट्टीवासीय आणि विविध संस्थांकडून करण्यात येत होती. त्यावर अखेर राज्य शासनाने शिक्कामोर्तब केला आहे. यासंबंधीचे आदेश नगरविकास खात्याने मंगळवारी काढले आहेत.
या आदेशानुसार एसआरए योजनेत झोपडपट्टीधारकांना २५.०० चौमी ऐवजी आता २७.८८ चौमी म्हणजेच ३०० चौरस फुटांची एसआरए सदनिका देण्याबाबत प्राधिकरणाने फेरबदलाची कार्यवाही त्यासंबंधीचा अहवाल राज्य शासनाला मंजुरीसाठी सादर करावा, असे स्पष्ट केले आहे. त्यानुसार आता या निर्णयावर हरकती सूचना मागवून त्यास अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर झोपडपट्टी वासीयांना तीनशे चौरस फुटांचे घर मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.


















