- भोसरी रुग्णालयाच्या खाजगीकरणाचा तीव्र निषेध
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ फेब्रु.) :- पिंपरी चिंचवड महापालिकेने नागरिकांच्या कररूपी पैशातून काही कोटी रुपयांची उधळपट्टी करून, भोसरी येथे सुपरस्पेशालिटी रुग्णालयाची निर्मिती केली आहे. यात अद्ययावत यंत्रणा व उपकरणांचा समावेश आहे. रुग्णसेवा पुरविणेकामी खाजगी ठेकेदाराला वार्षिक २१ कोटी रुपये व यंत्रणेसह या रुग्णालयाचा ताबा देऊन, या सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या खाजगीकरणाचा घाट महापालिकेने घातलेला आहे. त्याबदल्यात कोणतेही भाडे न आकारता पुर्ण रुग्णालय खाजगी संस्थेस चालविण्यास महापालिका देणार आहे.
भ्रष्टाचाराने बजबजलेल्या महापालिकेचा व पदाधिकाऱ्यांचा आणखी एक मोठा गैरव्यवहार उघडकीस आला असून, या रुग्णालयाच्या खाजगीकरणाचा घाट घालून, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पारदर्शक कारभाराचा उत्तम नमुनाच जनतेपुढे पेश केला आहे, असा आरोप आधार सोशल फौंडेशनचे अध्यक्ष विकास भुंबे यांनी केला आहे. या कृतीचा निषेध करून, भुंबे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले असून, या प्रकरणाचा छडा लावावा व आयुक्त हर्डीकर यांची बदली करावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील भोसरी येथे महापालिकेने करोडो रुपये खर्च करून, नाविन्यपूर्ण रुग्णालयाची इमारत उभी केली आहे. सुमारे १०० बेडचे हे सुपरस्पेशालिटी रुग्णालय उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असून, गोरगरीब नागरिकांसाठी या रुग्णालयाची निर्मिती झालेली आहे, असे असताना महापालिका रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी सत्ताधाऱ्यांच्या दबावापोटी या रुग्णालयाच्या खाजगीकरणास बढावा देत आहेत, तशा प्रस्तावास महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोधकांचा विरोध झुगारून सत्ताधाऱ्यांनी मान्यता दिलेली आहे. त्यामुळे महापालिका हे रुग्णालय सांभाळण्यास सक्षम नसल्याचे या प्रकारावरून दिसून येत आहे.
खाजगीकरण हे जनहितविरोधी व देशद्रोही धोरण आहे. बहुतांशी खाजगी रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी गोर-गरीब रुग्णांना प्रशासकीय यंत्रणेशी झगडावे लागते, तरी देखील या मुजोर रुग्णालयांना त्याचे सोयरेसुतक नसते. अशा वेळी या रुग्णांना महापालिका व शासकीय रुग्णालयेच देवदूत वाटतात. अशा परिस्थितीत जर शासकीय रूग्णालयांचेच खाजगीकरण झाले, तर या गोरगरीब रुग्णांनी जायचे कुठे? हा प्रश्न उपस्थित होतो आहे. महापालिकेने प्रत्येकी क्षेत्रीय कार्यालयामध्ये १०० खाटांचे अद्ययावत रुग्णालयांची उभारणी करावी, जेणेकरून महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयावरचा ताण कमी होईल.
शहरातील प्रत्येक नागरिक हा महापालिकेचा करदाता आहे. त्याला माफक दरात आरोग्यसुविधा पुरविणे हे महापालिकेचे आद्य कर्तव्य आहे. कोणाच्या तरी आर्थिक हित लाभासाठी खाजगीकरणास चालना देणारा हा उद्योग महापालिकेने थांबवावा. मुख्यमंत्र्यांनी महापालिकेच्या कारभारात लक्ष्य घालून, भोसरी रुग्णालयाचे खाजगीकरण होऊ न देता, पारदर्शक कारभाराचे प्रत्यक्ष उदाहरण शहरवासियांना दाखवावे व या खाजगीकरणामागचे खरे जनक कोण आहेत, हे शोधून काढावे, तसेच महापालिका आयुक्त यांना बडतर्फ करावे, अशी मागणी या पत्रात विकास भुंबे यांनी केलेली आहे.











