- सोमवारपासून पालिकेवर येणार प्रशासनराज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ मार्च २०२२) :- निवडणुका मुदतीत न होता त्या लांबणीवर पडल्याने पिंपरी – चिंचवड महापालिका रविवारी (दि. १३) बरखास्त होत आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व मनसेच्या नगरसेवकांनी शुक्रवारी (दि. ११) महापालिकेचा निरोप घेतला.
पदाधिकारी व नगरसेवकांनी सामूहिकरित्या आयुक्त राजेश पाटील यांच्यासोबत छायाचित्रे काढून घेतली. सोमवार (दि. १४) पासून आयुक्त पाटील हे प्रशासक म्हणून कामकाज पाहणार आहेत. फेब्रुवारी २०१७ ला झालेल्या पंचवार्षिकेचा कालावधी रविवारी रात्री बारा वाजता संपत आहे. शनिवारी (दि. १२) व रविवारी (दि. १३) साप्ताहिक सुटी असल्याने महापालिका बंद असणार आहे. त्यामुळे पदाधिकारी व नगरसेवकांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर एकत्र येत छायाचित्र काढून घेतले. अनेकांनी सेल्फी काढून घेतले. तसेच, आपल्या दालनात पदाधिकाऱ्यांनी फोटोसेशन करून घेतले.
यावेळी महापौर उषा ढोरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, उपमहापौर हिराबाई घुले, स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे, मनसे गटनेते सचिन चिखले, विविध विषय समितीचे अध्यक्ष, क्षेत्रीय समितीचे अध्यक्ष, नगरसेवक व स्वीकृत सदस्य उपस्थित होते.











