- विकासासाठी १० कोटींचा निधी; तेली समाजबांधवांच्या मागणीची दखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ मार्च २०२२) :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात मावळ तालुक्यातील सुदुंबरे येथील संत जगनाडे महाराज समाधिस्थळाला ब वर्ग तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळाचा दर्जा देऊन तेथील विकासासाठी १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून मंदिराचे दगडी बांधकाम, सुशोभीकरण, नदी काठ सुशोभीकरण, भक्तनिवास आदी कामे करण्यात येणार आहेत.
सुदंबरे येथे संत संताजी महाराज जगनाडे यांचे समाधीस्थळ असून विशेषतः महाराष्ट्रातील तेली समाजबांधवांचे हे श्रद्धास्थान आहे. असंख्य भाविक याठिकाणी दर्शनासाठी येत असतात. या पार्श्वभूमीवर सुदुंबरे येथील संत संताजी महाराज तेली संस्थेचे अध्यक्ष शिवदास उबाळे, विजय रत्नपारखी, राजेश येवले, विजयकुमार शिंदे, पोपट पिंगळे, सुलोचना कडीले, दत्तात्रय शेलार, भिकाजी भोज, पंडित पिंगळे, विजय रत्नपारखी, आप्पा शेलार, प्रशांत भागवत, शैलेश मखामले, सतिष वैरागी, विमल वाव्हळ यांनी या समाधी स्थळाला तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा अशी मागणी केली होती. या संदर्भात मंत्री विजय वडेट्टीवार व आमदार सुनील शेळके यांनी विशेष पाठपुरावा केला होता. या तीर्थक्षेत्र विकासाचा सुमारे ७० कोटींचा आराखडा बनविण्यात आला असून याला मान्यता द्यावी अशी मागणी उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे करण्यात आली होती.
त्यानुसार उपमुख्यमंत्री पवार, मंत्री वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत नुकतीच एक बैठकही झाली होती. दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री पवार यांनी या समाधी स्थळाला ‘ ब ‘ वर्ग तीर्थ क्षेत्राचा दर्जा घोषित करून तेथील विकासासाठी पहिल्या टप्प्यात १० कोटी रुपयांचा निधी या अर्थसंकल्पात उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे सांगितले.
संत संताजी महाराज जगनाडे यांचे समाधीस्थळ मावळ तालुक्यात आहे, हीच खरी मावळवासीयांच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. गेली अनेक वर्षे हे पवित्र स्थान विकासापासून वंचित होते. उपमुख्यमंत्री पवार यांनी आज दर्जा जाहीर करून पहिल्या टप्प्यात १० कोटींचा निधीही दिला, सुमारे ७० ते ८० कोटींच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास मान्यता घेऊन त्यानुसार आणखी निधी लवकर उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करणार आहे. – सुनील शेळके, आमदार मावळ…













