न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मार्च २०२२) :- पिंपळे सौदागर परिसरात सामाजिक कार्यकर्त्या सौ. अनिताताई संदीप काटे यांनी गरजूंना आधार व वस्तुरूपी मदतीसाठी माणुसकीची भिंत उभारली आहे.
येथील दानशूर नागरिक अनावश्यक वापरात नसलेले कपडे, चादरी. अन्नधान्याची किट्स आणि इतर गृहउपयोगी वस्तू एका भिंतीला अडकवत आहेत. गरजूंना ज्या वस्तूंची गरज असेल, त्या वस्तू त्या घरी नेत आहेत. शिवाय गरजेच्या वस्तू घेऊन जाणारे गरजू लोक दुसऱ्या दिवशी त्यांच्या ओळखीतल्या इतर गरजूंनाही या उपक्रमात सहभागी करून घेत आहेत.
माणुसकीची भिंत ही संकल्पना आता चळवळीचा आकार घेत आहे. या योजनेतील नावीन्य, आणि त्याला मिळणारा नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद पाहता सर्वत्रच ठिकठिकाणी माणुसकीची भिंती उभारल्या पाहिजेत; जेणेकरून सामाजिक जबाबदारी निभावण्याची एक आगळी वेगळी संधी सर्वांनाच प्राप्त होईल, असे मत सौ. अनिताताई संदीप काटे यांनी व्यक्त केले.
















