न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ फेब्रु.) :- महापालिका शिक्षण विभाग समावेशित शिक्षण उपक्रम व बजाज दृष्टी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये अल्पदृष्टीदोष असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणामधील अडथळे दूर करण्याच्या हेतूने मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी महापालिका समन्वयक दत्तात्रय खुटवड, मुख्याध्यापिका हर्षा बाठिया, विशेष शिक्षक दत्ता गवळी यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आदी उपस्थित होते.
दत्तात्रय खुटवड म्हणाले की, शाळकरी मुलांना चष्मा लागण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामागे टीव्ही, मोबाईलचा वापर, अभ्यासाचा ताण, अशी कारणे सांगून मुलांना त्याबद्दल दोष दिला जातो. वास्तविक, चष्मा लागण्यामागे अनुवंशिकता आणि जन्मजात डोळे कमकुवत असणे, ही प्रमुख कारणे आहेत. फार जवळून जास्त वेळ टीव्ही पाहू नका, मोबाईलचा अतिरेकी वापर टाळा, डोळे स्वच्छ धुवा, आहारात पालेभाज्यांचे प्रमाण वाढवा, वर्षातून एकदा तरी डोळे तपासा, नंबर लपवून ठेवू नका, असे आवाहनही खुटवड यांनी विद्यार्थ्यांना केले.











