- पालिकेच्या कारभारामुळे पालकांमध्ये नाराजगी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मार्च २०२२) :- महापालिकेमध्ये आरोग्य सेविका (एएनएम) पदाच्या ८८ रिक्त जागा भरण्यात येणार होत्या. यासाठी थेट मुलाखतीतून उमेदवारांची निवड केली जाणार होती. मात्र, ही भरती प्रक्रिया प्रशासनाने अचानक रद्द केली. ही माहिती विद्यार्थ्यांना आज उशिरा मिळाल्यामुळे विविध जिल्ह्यातून आज सकाळी पालिका भवनात परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला. त्यांनी नाराजगी व्यक्त केली.
महापालिकेच्या कॉर्पोरेशन हेल्थ अॅण्ड फॅमिली वेल्फेअर सोसायटी अंतर्गत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान सुरू आहे. त्यासाठी आरोग्य सेविका पदाच्या ८८ जागा भरण्यात येणार होत्या. त्यासाठी थेट मुलाखतीतून महिला उमेदवारांची निवड केली जाणार होती. ही भरती कंत्राटी स्वरुपाची होती.
एकत्रित दरमहा मानधन १८ हजार दिले जाणार होते. त्यासाठी १६ व १७ मार्चला मुलाखती घेण्यात येणार होत्या. मात्र, प्रशासकीय कारणास्तव भरती रद्द केल्याचे कळविले आहे. ही भरती कोरोना काळात काम केलेल्या आरोग्य सेविकांना प्राधान्य देण्यासाठी रद्द केल्याचे सांगितले जात आहे.


















