- उपसूचना ग्राह्य की अग्राह्य; आयुक्तांच्या भूमिकेकडे लक्ष…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मार्च २०२२) :- प्रशासकराज आल्याने स्थायी समितीने मंजूर केलेला आणि सर्वसाधारण सभेच्या अंतिम निर्णयासाठी पाठविलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अर्थसंकल्पाबाबत उत्सुकता होती. स्थायीने उपसूचनांसह मंजूर केलेल्या अर्थसंकल्पास महापालिकेच्या प्रशासकाच्या अधिपत्याखाली होणाऱ्या सभेत मंजुरी दिली जाणार आहे. उपसूचना ग्राह्य आणि अग्राह्य केल्यानंतर अर्थसंकल्प लागू होणार आहे.
पिंपरी – चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी स्थायी समितीला सादर केला. त्यानंतर २३ फेब्रुवारीला अध्यक्ष अॅड . नितीन लांडगे यांनी बदल सुचविले. वाढ – घटीच्या ८८५ कोटी ६६ लाख रुपयांच्या उपसूचना स्वीकारून सर्वसाधारण सभेकडे मंजुरीसाठी पाठविला होता. सन २०२१-२२ च्या सुधारित अंदाजपत्रकात २४७ कामांसाठी १०६ कोटी २९ लाखांहून जास्त विकासकामे करणे, सन २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात २७५ विकासकामांसाठी ८८५ कोटी ६६ लाख रुपयांहून जास्त शिफारस केली आहे. नवीन तसेच ६७ विकासकामांसाठी ६६ कोटी, ८७ लाख रुपयांहून जास्त शिफारस केली.
यामध्ये प्रामुख्याने सर्व नगरसेवकांना त्यांच्या प्रभागात आवश्यक त्या कामांसाठी दरवर्षी प्रत्येकी २५ लाख रुपयांची तरतूद करावी, अशीही शिफारस सर्वसाधारण सभेकडे केली होती. मात्र, नगरसेवकांचा कालखंड संपुष्टात आल्याने आणि महासभेची मान्यता न मिळाल्याने आयुक्तांचा अर्थसंकल्प लागू होणार की स्थायीचा? याबाबत उत्सुकता होती. प्रशासक म्हणून आयुक्त राजेश पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर स्थायी समितीने मंजूर केलेला अर्थसंकल्प लागू होणार असल्याचे सांगितले स्थायी समिती सदस्यांनी चांगल्या भावनेतूनच उपसूचना दिल्या आहेत. असे आयुक्त पाटील यांनी सांगितले.


















