पोलिसांच्या फ्लाईंग स्कॉडची टवाळखोरांवर नजर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मार्च २०२२) :- टवाळखार टोळकी धुलीवंदनाच्या दिवशी दारू पिऊन शहारत अक्षरशः धिंगाणा घालतात रस्त्याने जाणाऱ्या पादचाऱ्याना जबरदस्तीने रंग लावण्याचे प्रकार घडतात. काहीजण जाणीवपूर्वक महिलांना टार्गेट करतात; मात्र यंदा पोलिसांनी अशा टवाळखोरांवर कारवाई करण्यासाठी मास्टर प्लॅन तयार केला आहे. प्रत्येक पोलिस ठाण्यात एक फ्लाईंग स्कॉड तयार करण्यात आले आहे. हे स्कॉड धुडगूस घालणाऱ्या टोळक्यांची सकाळीच उचलबांगडी करणार आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, यंदा १७ तारखेला होळी तर १८ तारखेला धुलीवंदन आहे कोरोनामुळे मागील दोन वर्ष हा सण साजरा करण्यावर बंधने होती. आता निर्बंधात शिथिलता आली आहे. त्यामुळे यंदा हा सण जास्त मोठ्या प्रमाणात साजरा करण्यास तरुणाई सज्ज झाली आहे. मात्र, काही टवाळखोर बस, ट्रेन, खासगी वाहने किंवा दुचाकीवरून जाणाऱ्या विशेषतः महिलांच्या अंगावर फुगे किंवा प्लास्टिकच्या पिशव्या फेकून मारतात. अचानक फुगा लागल्यामुळे तोल जाऊन दुचाकीस्वाराचा अपघात होण्याची जास्त शक्यता असते. तसेच, फुगा डोळ्यावर लागल्यावर रंग डोळ्यात किंवा फुग्याचा फटका जाऊन डोळ्यावर बसल्याने दुखापत होण्याचे प्रकार दरवर्षी घडतात.
धुळवडीला काहीजण दारू पिऊन ट्रिपल सीट वाहन चालवितात. त्यामुळे अपघाताची मोठी शक्यता असते. पोलिसांची साध्या वेषातील पथके ( फ्लाइंग स्कॉड ) हद्दीत गस्त घालणार आहेत. झोपडपट्टी भागात पोलीसांचे विशेष लक्ष असणार आहे. दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या टवाळांची थेट उचलबांगडी करण्याचे आदेश या स्कॉडला देण्यात आले आहेत त्यामुळे यंदा मद्यपी टोळक्यांची धूळवड पोलिस ठाण्यातच होईल


















