- सात दिवसात थकीत एल.बी.टी. भरा अन्यथा कायदेशीर कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मार्च २०२२) :- सन २०१३ ते २०१७ या कालावधीपर्यंत एल.बी.टी. होता व तदनंतर ३० जून २०१७ रोजी एल.बी.टी. रद्द करण्यात आला. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आज अखेरपर्यंत साधारणत: ३५८९२ इतक्या व्यावसायिकांनी एल.बी.टी. नोंदणी केली असून असून त्यापैकी आज अखेर पर्यंत फक्त २०२३३ इतक्या नोंदणीकृत एल.बी.टी. धारकांनी एल.बी.टी. भरला आहे. त्याबाबत अंतिम कर निर्धारण निश्चित करण्याची कार्यवाही सुरु आहे.
अशा नोंदणीकृत एल.बी.टी. धारकांना ई-मेल,एस.एम.एस.,पोस्ट, दुरध्वनीव्दारे वारंवार कागदपत्रे सादर करणेकामी एल.बी.टी. विभागामार्फत नोटिसा देण्यात येत आहेत. तथापि त्यापैकी केवळ साधारणत: १० टक्के एल.बी.टी. धारक व्यावसायिकांनीच कागदपत्रे सादर केलेली आहेत परंतु उर्वरीत व्यावसायिकांना वारंवार कळवूनही कागदपत्रे सादर न केल्याने Best Judgment च्या आधारे तसेच इतर शासकीय विभागातील उपलब्ध माहितीच्य आधारे अशा एकूण सुमारे ५२३८ इतक्या संख्येच्या वार्षिक विवरणपत्रांबाबत नोंदणीकृत एल.बी.टी.धारकांना / व्यावसायिकांना अंतिम कर निर्धारण आदेश बजावण्यात आलेले आहेत.
सबब अद्यापही एल.बी.टी. चा भरणा न केलेल्या नोंदणीकृत व्यावसायिकांना त्वरीत एल.बी.टी. भरणेबाबत अंतिम सुचना म्हणून समक्ष नोटिस बजावण्याचे कामकाज एल.बी.टी. विभागामार्फत तीन पथके नियुक्त करु सुरु करण्यात आलेले आहे. तसेच करोना कालावधी लक्षात घेता कागदपत्रे सादर करणेकामी सात दिवसांची अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. तदनंतर मात्र एल.बी.टी. ची थकीत रक्कम न भरल्यास अथवा कागदपत्रे सादर न केल्यास आपले काहीही म्हणणे नाही असे समजून मिळकत कर वसुली कार्यवाही प्रमाणेच एल.बी.टी.ची थकीत रक्कम वसुल करणेकामी नियमानुसार जप्ती व अटकावणी करण्यात येईल याची नोंदणीकृत व्यावसायिकांनी गांभिर्यांने नोंद घ्यावी. एल.बी.टी. व्यावसायिकांनी पुढील सात दिवसात थकीत एल.बी.टी. भरण्यात यावा अन्यथा नियमाधिन कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आवाहन आयुक्त यांनी केले आहे.












