- परिसरात एकही कचराकुंडी नाही; आयुक्तांचा दावा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मार्च २०२२) :- पिंपरी – चिंचवड शहरात ई क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रात दररोज जमा होणाऱ्या ओला व सुका कचराचे तब्बल ९५ टक्के वर्गीकरण केले जात आहे. हा परिसर १०० टक्के कचराकुंडी मुक्त झाला असून तेथे एकही कुंडी ठेवण्यात आलेली नाही. नागरिकांकडून स्वच्छ सर्वेक्षणास उत्तम प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी बुधवारी (दि. १६) दिली.
आयुक्त पाटील यांनी सांगितले देशात पहिल्या तीन शहरांमध्ये क्रमांक पटकाविण्यासाठी पालिका प्रशासनाद्वारे अधिकारी व कर्मचारी तसेच, नागरिकांनी स्वच्छ शहर बनविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामध्ये नागरिकांची भूमिका महत्वपूर्ण आहे. स्वच्छ सर्वेक्षणात नागरिकांच्या सहभागाला प्रोत्साहन देणे. शहराचे राहणीमान चांगले बनविण्याकरीता समाजातील सर्व घटकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात येत आहे. दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या या मोहिमेद्वारे ई क्षेत्रीय कार्यालयांतर्गत दररोज ११० ते १२० टन कचरा जमा केला जातो. त्यामध्ये केवळ १.५ टन कचरा हा मिक्स स्वरुपाचा आहे. यात वेस्ट, चिकन वेस्ट, सॅनिटरी वेस्ट, ओला, सुका कचरा, जलपर्णी, इतर कचरा डोर टू डोर जमा केला जातो. प्रभाग क्रमांक ३, ४, ५ व ७ चा भाग ई क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रात येतो. हा संपूर्ण भोसरी परिसर आहे. त्यात शांतीनगर झोपडपट्टीचा भाग येत असून व्यावसायिक व निवासी भागात सामाजिक संस्थांच्या सहकार्याने घरोघरी स्वच्छ सर्वेक्षणाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. व्यावसायिक व निवासी सोसायट्यांची बैठक घेतली जाते. नागरिकांचा सहभाग, जनजागृतीवर भर, दर शनिवारी प्लॉगथोनचे आयोजन करून प्लास्टीक कचरा जमा केला जातो.
कचरा विलगीकरण न करणाऱ्या तसेच, उघड्यांवर कचरा टाकणाऱ्या नागरिकांना १८० रुपये तर, व्यावसायिकांकडून ३०० रुपये दंड आकारला जातो. मोकळ्या जागेत बायोमेडीकल वेस्ट टाकणाऱ्याकडून २५ हजाराचा दंड वसूल केला जातो. महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान या कामासाठी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना सहाय्य करीत आहेत.












