- पोलीस आयुक्तांचे कडक अंमलबजावणीचे पोलीस ठाण्यांना आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मार्च २०२२) :- चोरी केलेला माल भंगाराच्या दुकानात विकला जातो. यामुळे भंगाराच्या दुकानामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले तर चोरीचा माल खरेदी करण्याला आळा बसेल. यामुळे भंगाराच्या दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे बसवा. आलेल्या आणि गेलेल्या मालाची नोंद ठेवा, असे आदेश पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आयुक्तालयाच्या सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत.
चाकण, चिखली, तळेगाव, एमआयडीसी भोसरी या परिसरात अनेक मोठमोठे कारखाने आहेत. या कारखान्यांना लागणारे सुटे पार्ट तयार करणारे हजारो लघुउद्योग आहेत. काम करताना त्यातून भंगाराची निमिर्ती होते. हे भंगार खरेदी करण्यासाठी माफियांच्या टोळ्या निर्माण झाल्या आहेत. अशा टोळ्यांवर पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी कारवाई करत प्रसंगी खंडणीचे गुन्हे देखील दाखल केले आहेत. मात्र औद्योगिक परिसरात भंगार किंवा कच्च्या मालाची चोरी करणाऱ्या अनेक टोळ्या कार्यरत आहेत. रात्रीच्या वेळी सुरक्षा रक्षकाला महिला आमिष दाखवून भूलवून ठेवतात. तर दुसरीकडे त्यांचे साथीदार चोरी करतात. तर कधी – कधी शस्राचा धाक दाखवून तर कधी बंद कारखान्यातून चोरी केली जाते. चोरी केलेला माल भंगार दुकानदारांना विकला जातो. जोपर्यंत गुन्हा दाखल होतो तोपर्यंततो माल भंगाराच्या दुकानात विल्हेवाट लावण्यासाठी शहराबाहेर पाठविला जातो. अशावेळी भंगाराच्या दुकानाची तपासणी केल्यावरही पोलिसांच्या हाती काहीच लागत नाही.
चोरीच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी सर्व भंगाराच्या दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. तसेच आलेल्या आणि गेलेल्या मालाची वाहनांच्या क्रमांकासह नोंद ठेवावी असे आदेश पोलीस आयुक्तांनी यापूर्वीच दिलेले होते. मात्र त्यांची अंमलबजावणी होत नसल्याने दोनच दिवसांपूर्वी पोलीस आयुक्तांनी याबाबत पुन्हा सर्व पोलीस ठाण्याला वायरलेसद्वारे आदेश देऊन कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या.












