- “वारा पांगुन गेला” रंगांची उधळण करणाऱ्या फुलझाडांची वेगाने घट
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ फेब्रु.) :- वसंताची चाहुल लागताच निसर्ग रंगाची उधळण करण्यासाठी सज्ज होतो. अशीच अनेक शोभेची फुलझाडे आपल्या शहरात एकेकाळी मोठ्या संख्येने रस्त्याच्या कडेला, उद्यानात, टेकडी परिसरात बहरत असत. परंतु, वाढते शहरीकरण आणि पालिका उद्यान विभागाचे दुर्लक्ष ह्या प्रमुख दोन कारणामुळे सदरच्या शोभेच्या फुलझाडांमध्ये गेल्या तीन वर्षांमध्ये वेगाने घट होत आहे.
विविध रंगाच्या गुलबक्षी, गुलमोहर, कोरांटी, बहावा, विविधरंगी आणि प्रजातीचे बोगणवेल, लाल निवडूंगी, जंगली जास्वंद, मैदानी वडेलिया, बांधावरची पिवळी कण्हेर, विविधरंगी चाफा, रंगीत अष्टर या शोभेच्या फुलझाडांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहेत.
फेब्रुवारी महिन्याची सुरुवात झाली की, प्राधिकरणातील उद्याने मग ते संत ज्ञानेश्वर असो की गजानन महाराज, संत तुकाराम उद्याने अनेक विविधरंगी फुलांचे दर्शन होत असे. परंतु, लागवड आणि उद्यान विभागाची उदासीनता यामुळे सदरची फुलझाडे नष्ट झाली आहेत. या झाडांचे जतन आणि संवर्धन होण्यासाठी प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचा पर्यावरण विभागाचा एक अभ्यास गट कार्यरत आहे.
समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विजय पाटील, विजय मुनोत, संदीप सकपाळ, विजय जगताप, संतोष चव्हाण पर्यावरणपूरक शोभेच्या झाडांचा अभ्यास करीत आहेत. सदरच्या फुलझाडांमुळे मधमाश्या, विविधरंगी कीटक, फुलपाखरे, छोटे पक्षी यांचीही संख्या त्यामुळे रोडावली आहे.
याबाबत पर्यावरण अभ्यासक समिती प्रमुख विजय पाटील म्हणाले,” एके काळी प्राधिकरणातील उद्याने विविधरंगी फुलोऱ्यासाठी तसेच हिरवाईसाठी आदर्श होती. परंतु, महापालिका उद्यान विभागाच्या अनागोंदी कारभाराचा फटका प्राधिकारणातील या उद्यानांनाही बसला आहे. फुलझाडांच्या अपुऱ्या पुरवठयामुळे रंगांची उधळण आता नजरेआड होत आहे. चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या अधिकारी-अधीक्षकांवर यांबाबत त्वरित कार्यवाही करावी.”











