- स्वहस्ते बनविलेल्या गणपतीच्या प्रतिष्ठापनेतून उत्सवाचा आनंद द्विगुणित ; नगरसेविका मंजुश्री खर्डेकर
- शाडू मातीचे गणपती साकारण्याची कार्यशाळा संपन्न.
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे : पर्यावरणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट चे अध्यक्ष अशोकराव गोडसे यांनी केले. शाळेतील मुले स्वहस्ते शाडू मातीचा गणपती तयार करत आहेत हे बघून मनापासून आनंद होत असून अश्या छोट्या छोट्या उपक्रमातूनच प्रदूषणाच्या समस्येवर मात करता येईल आणि भावी पिढीला एक स्वच्छ वातावरणाचा वारसा देता येईल असे ही ते म्हणाले. आमचे आजोबा व वडील यांनी दीड दिवसाच्या गणपती बसविण्यापासून सुरुवात केली आणि आज दहा दिवसाचा उत्सव उत्साहाने साजरा होतो मात्र ते करताना सामाजिक भान ठेऊन समाजोपयोगी कार्यक्रम ही गणेश मंडळांनी घ्यावेत असे ही अशोकराव म्हणाले.
क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि शाहू लक्षमी कला क्रीडा अकादमी च्या वतीने महापालिकेच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय शाळेत शाडू मातीपासून गणपती बनविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाच्या संयोजिका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या ” मी माझ्या घरी गेल्या वर्षीपासून कार्यशाळेत स्वहस्ते बनविलेल्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करत असून त्यातून या उत्सवाचा माझा आनंद द्विगुणित होतो, तसेच माझी कन्या नैसर्गिक रंगांनी ही मूर्ती रंगवते व आम्ही मोठ्या टपात याचे विसर्जन करतो त्याद्वारे आमच्या परीने आम्ही पर्यावरण रक्षणास हातभार लावल्याचे समाधान मिळते, असे ही त्या म्हणाल्या. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या घरी व परिसरातील नागरिकांना ही याबाबत शिक्षित करावे व थर्मोकोल, प्लास्टिक च्या सजावटी न करणे तसेच प्लास्टर ऑफ पॅरिस च्या मूर्तींचा वापर टाळा या मोहिमेचे दूत व्हावे असे आवाहन केले.
राज तांबोळी नावाचा धर्माने मुस्लिम असलेला कलाकार शाडू मातीचे गणपती बनविण्याचे प्रशिक्षण देतो, दिवाळीत किल्ले बनविण्याची व रांगोळी काढण्याची कार्यशाळा घेतो, शेलेच्या मुख्याध्यापिका एलिझाबेथ काकडे ह्या ख्रिश्चन असून उत्साहाने या कार्यक्रमाची तयारी करून सरस्वती पूजन करतात, हा खरा सर्व धर्म समभाव असून याचे अनुकरण सर्वांनी केल्यास खऱ्या अर्थाने गणेशोत्सवाचा हेतू सफल होईल असे क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी नमूद केले.
नगरसेविका माधुरीताई सहस्त्रबुद्धे यांनी ” अक्कण माती चिक्कण माती” हे गाणे मुलांकडून म्हणवून घेतले आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्साह संचारला.
मुलांना प्रशिक्षित करणाऱ्या राज तांबोळी आणि कन्याकुमारी आढाव यांचा अशोकराव गोडसेंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी राज तांबोळी यांनी त्यांच्या विविध कार्यशाळांचे अनुभव सांगितले आणि मुले त्यांच्या कल्पनाशक्तीतून अप्रतिम मूर्ती साकारतात आणि तब्बल ६०० विद्यार्थी कार्यशाळेत बनविलेले गणपती ची घरी स्थापना करतात असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन शर्मिला गायकवाड यांनी केले, संदीप खर्डेकर यांनी प्रास्ताविक तर नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी स्वागत व संयोजन केले.
यावेळी नगरसेविका माधुरीताई सहस्त्रबुद्धे, शाळेच्या मुख्याध्यापिका एलिझाबेथ काकडे, शिक्षिका कल्याणी चौधरी, स्नेहा पथक, अर्चना खेडेकर, भाजपचे प्रभाग सरचिटणीस राजेंद्र येडे, सुनील होलबोले, चंद्रकांत पवार, इ मान्यवर उपस्थित होते.