- त्वरित पाणी गळती रोखा; शिवसेनेच्या संदीप भालके यांची पालिकेकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ एप्रिल २०२२) :- वाल्हेकरवाडीतील महाजन हॉस्पिटलसमोरील चिंचवडे कॉलनी २ येथील जलवाहिनीला गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी गळती लागली आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे याकडे दुर्लक्ष झाल्याने हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे.
अगोदरच पाण्याची समस्या जटिल होत असताना पाण्याची नासाडी होत आहे. दिवसाआड पाणीपुरवठ्याने नागरिक मेटाकुटीला आलेले आहेत. त्यात भर उन्हाळ्यात पाणी गळती होत असल्याने नागरिकांना अपुरा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे, अशी प्रतिक्रिया चिंचवड शिवसेना विभाग प्रमुख संदीप भालके यांनी दिली.
ते म्हणाले, महापालिकेमार्फत वाल्हकेरवाडी परिसरात पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेने जलवाहिन्या टाकल्या आहेत. या जलवाहिन्यांतून विविध भागांना दररोज पाणीपुरवठा केला जातो. मात्र बहुतेक भागात टाकण्यात आलेल्या जलवाहिन्यांतून मोठय़ा प्रमाणात पाण्याची गळती होत असल्याचे समोर आले आहे. यातून मोठय़ा प्रमाणात पाणी वाया जात आहे. हे पाणी रस्त्यावर आल्याने रस्त्यावर चिखल झाला आहे. तक्रार करून कोणतीही कार्यवाही होत नाही.