न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ एप्रिल २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे यांची ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारीपदी, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता संजय खाबडे यांची सहशहर अभियंतापदी, लेखाधिकारी प्रदिप बाराधे यांना उपमुख्य लेखा व वित्त अधिकारीपदावर पदोन्नती देण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांसह विद्युत, नगररचना, अग्निशमन विभागातील २७ कर्मचाऱ्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नतीने बढती देण्यात आली आहे.
३० मार्च रोजी पदोन्नती समितीची बैठक झाली. या बैठकीत शैक्षणिक अर्हता, अनुभव, आरक्षण आणि सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती समितीने शिफारस केल्याप्रमाणे प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांनी २७ अधिकारी, कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यासंदर्भात गुरूवार (दि. १४) रोजी आदेश जारी केले आहेत.
अग्निशामन विभागातील एकाच वेळी १८ फायरमन यांना पदोन्नती देण्यात आली. यामध्ये त्यांची शैक्षणिक अर्हता, अनुभव, आरक्षण आणि सेवा ज्येष्ठतेनुसार रिक्त पदावरील १८ फायरमन यांना लिडिंग फायरमन (प्रमुख अग्निशमन विमोचक) म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे.
















