न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि ८ फेब्रु.) :- पुण्यातील ‘यशस्वी’ संस्थेचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांना शिक्षण व स्किल डेव्हलपमेंट क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते ‘सूर्यदत्ता जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. स्मृतिचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. याप्रसंगी सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया, परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्वर मुळ्ये, लेफ्टनंट जनरल डॉ. डी. बी. शेकटकर उपस्थित होते.
मध्यमवर्गीय कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या विश्वेश कुलकर्णी यांनी १९८२ ला ‘यशस्वी’ संस्थेची स्थापना करून, सुरुवातीला विविध कंपन्यातील नोकरीच्या संधी बेरोजगार उमेदवारांना मिळवून देण्यासाठी प्लेसमेंट कन्सल्टन्सीची सुरुवात केली. पुढे जाऊन शिका व कमवा या योजनेद्वारे हजारो विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कंपनीत काम व त्यासोबतच मोफत मॅकेनिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली. सध्या ‘यशस्वी’ संस्थेच्या माध्यमातून देशभरातील २३ राज्यातून ६५० हुन अधिक कंपन्यांमधून सुमारे ५५ हजारहुन अधिक विद्यार्थी ऑन द जॉब ट्रेनिंगद्वारे रोजगारक्षम होत आहेत. याशिवाय महाराष्ट्रातील पहिले स्किल डेव्हलपमेंट सेंटर व पंजाब राज्यातील अमृतसर येथील मल्टी स्किल डेव्हलपमेंट सेंटरची उभारणी देखील ‘यशस्वी’ संस्थेद्वारे करण्यात आली आहे.
बेरोजगार युवकांना रोजगारक्षम होण्यासाठी कौशल्य प्रशिक्षणाचा अभिनव मार्ग दाखवून हजारो युवकांना विकास वाटेवर नेणाऱ्या ‘यशस्वी’च्या उल्लेखनीय कामाची दखल घेत संस्थेचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांची यंदाच्या सूर्यदत्ता जीवन गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.











