- इंद्रायणी महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागात राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि ८ फेब्रु.) :- इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या इंद्रायणी महाविद्यालयात वाणिज्य विभागाच्यावतीने ‘भारतातील सामाजिक संस्थां, कंपनीच्या सामाजिक जबाबदारीतील सहभागाचा प्रभाव’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. सीएसआर फंडाचा गरिबांच्या कल्याणासाठी सदुपयोग व्हावा, अशी अपेक्षा माजी आमदार व संस्थेचे अध्यक्ष कृष्णराव भेगडे यांनी व्यक्त केली.
चर्चासत्राचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वाणिज्य विभागप्रमुख डॉ. डी. आर. माने यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार कृष्णराव भेगडे होते. चर्चासत्राचे बीजभाषण डॉ. विजय पिठाडिया यांनी केले. यावेळी संस्थेचे कार्यवाह रामदास काकडे, प्राचार्य डॉ. एस.के. मलघे, डॉ. बी.के. रसाळ, डॉ. डी.पी. काकडे, प्रा. आर.आर. भोसले, प्रा. ई.डी. गायकवाड, प्रा. पी.के. पानकर, प्रा. जोशी, प्रा. सक्सेना आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चर्चासत्रात डॉ. पिठाडिया यांनी आपल्या बीजभाषणात कंपनीची सामाजिक जबाबदारी व त्यातील भारतातील सामाजिक संस्थांच्या सहभागाचा प्रभाव यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पहिल्या सत्रात डॉ. महेश ठाकूर (महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था) यांनी सामाजिक जबाबदारीच्या व्याप्तीचे स्वरुप उदाहरणे देत स्पष्ट केले. महाराष्ट्रातील सत्तरहून अधिक सामाजिक संस्थांची भूमिका विषद करीत सामाजिक जबाबदारीची सद्यस्थिती बदलण्यासाठी नेमके काय केले पाहिजे, हे सांगितले.
दुसर्या सत्रात डॉ. महेंद्र देशपांडे (राजकोट) यांनी सामाजिक जबाबदारीतून ग्रामीण विकास कसा साधावा, याचा आढावा घेतला. ठाणे येथील डिजिटल मार्केटिंग इन्स्टिट्युटचे संचालक योगी उदगिरे यांनी तंत्रज्ञान व सोशल मीडिया यांची सामाजिक जबाबदारीतील भूमिका स्पष्ट केली. डॉ. एस.के. पोळ यांनी भारतीय संस्कृती व सामाजिक जबाबदारी याचा मेळ साधला.
चर्चासत्राच्या दुसर्या दिवशी तिसर्या सत्रात अॅड. मंदा गायकवाड यांनी स्त्रियांचे समाजातील स्थान, हक्क आणि अधिकार स्पष्ट करीत महिला सबलीकरणाच्या सामाजिक जबाबदारीवर प्रकाश टाकला. चौथ्या सत्रामध्ये डॉ. बालसुब्रमण्यम दमन यांनी समाजातील जीवनात्मक वारसांबाबत जबाबदारी व्यक्त केली. सिद्धांत मॅनेजमेंट इन्स्टिट्युटचे उपसंचालक डॉ. अतूल कुमार यांनी सामाजिक जबाबदारीची गरज का आहे, हे सांगितले. डॉ. बी.एम. पुरोहित यांनी सामाजिक जबाबदारीतून चिरंतन विकास कसा साधावा, हे यावर भाष्य केले. या दोन दिवसीय चर्चासत्राचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. एस.के. मलघे यांनी भूषविले.
चर्चासत्राचे संयोजक प्रा. बी.के. रसाळ यांनी आभार मानले.











