- शहरातील तृतीयपंथीयाची भावना; पालिकेने घडविली मेट्रो सफर…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ एप्रिल २०२२) :- सर्वसामान्य जीवनशैली जगत असताना लोकव्यवहाराशी सांगड घालत सार्वजनिक आयुष्य सहजतेने जगता यावे यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला असून तृतीयपंथीय समाजाला सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देत त्यांना मेट्रो आणि पीएमपीएमएल बसची सफर घडवली.
आजादी का अमृत महोत्सव साजरा करत असताना महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समाजातील सर्व घटकांना सामावून घेण्यासाठी महापालिकेच्या वतीने सर्वसमावेशक योजना आणि उपक्रम राबवण्यात येत आहेत. अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या नेतृत्वाखाली नागरवस्ती विकास योजना विभागाच्या वतीने महिला, बालके, ज्येष्ठ नागरिक यांच्यासह तृतीयपंथीय घटकांसाठी देखील योजना आणि उपक्रमांची आखणी करण्यात येत आहे. दुर्लक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अशा योजनांची कृतीशील अंमलबजावणी करण्यात येत असून त्या अनुषंगाने आज नागरवस्ती विभागाचे उपआयुक्त अजय चारठाणकर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने तृतीयपंथीयांना निगडी ते पिंपरी अशी पीएमपीएमएल बसची सफर घडवून आणली. यानंतर तृतीयपंथीयांना पिंपरी ते फुगेवाडी आणि फुगेवाडी ते पिंपरी असा मेट्रोप्रवास घडवून आणला. पीएमपीएमएलने यासाठी मोफत बससेवा उपलब्ध करुन दिली होती. या सफरीसाठी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल यांनी समन्वय केला.
आमच्या आयुष्यातील हा अतिशय आनंदाचा क्षण असून भीतीपोटी आम्ही सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे टाळत होतो. महापालिकेने आम्हाला आधार देत मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी केलेला प्रयत्न आमच्यासाठी लाखमोलाचा आहे, अशी भावना सफर केलेल्या तृतीयपंथी समाजाच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली. एरवी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करताना आम्हाला ओशाळल्यासारखे वाटते. पण आज अशा प्रवासाची सफर करवून महापालिकेने आमच्यातील न्यूनगंड दूर केला आहे. मनातील भीती दूर झाली. आजपर्यंत आम्हाला असा पर्याय उपलब्ध नव्हता. पण महापालिकेने पुढाकार घेऊन अतिशय स्तुत्य उपक्रम राबवला असून या सफरीमुळे भारावून गेलेल्या आमच्या समाजातील प्रतिनिधींचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे, अशा शब्दांत तृतीयपंथी नीलिमा यांनी समाधान व्यक्त केले. देशाचे नागरिक म्हणून आम्ही आमचे कर्तव्य बजावत आहोत. महापालिका आम्हाला जनसेवेची संधी देण्यासाठी पुढाकार घेत आहे. आम्हाला अशी संधी मिळाल्यास त्या संधीचे नक्की सोने करू, असा विश्वासदेखील नीलिमा यांनी बोलून दाखवला.
तृतीयपंथीयांना समाजात सहजतेने वावरता यावे, मनात असलेली भीती आणि न्यूनगंड दूर व्हावा यासाठी महापालिका पुढाकार घेत आहे. या समाजाच्या गरजांचा प्राधान्यक्रम ठरवून त्यानुसार योजना आणि उपक्रम राबवण्याचा संकल्प महापालिकेने केला आहे. यावर्षीच्या अंदाजपत्रकात २५ लाख रुपयांची तरतूददेखील त्यासाठी ठेवण्यात आली आहे. ज्या ज्या आस्थापनांकडून तृतीयपंथी समाजाला मदत होऊ शकते त्या त्या आस्थापनांना एकत्रित करून आंतरराष्ट्रीय तृतीयपंथीय ओळख दिनाचा संयुक्त कार्यक्रम महापालिकेने घेतला. तृतीयपंथी समूहाच्या सर्वांगीण विकासासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीने कौशल्य विकास, स्वयंरोजगार निर्मिती याबाबत विविध प्रशिक्षण शिबीर राबवण्याकडे महापालिकेने काम सुरु केले आहे. महापालिकेच्या वेगवेगळ्या सेवांमध्ये त्यांचा सहभाग आणि समावेश करण्याच्या दृष्टीने पर्यंत सुरु आहे.
उपायुक्त अजय चारठाणकर म्हणाले, तृतीयपंथीय समाजाने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्यासाठी सहजतेने करावा यासाठी आज बस आणि मेट्रो सफरीचे प्रयोजन करण्यात आले होते. तृतीयपंथीयांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन सकारात्मक व्हावा आणि त्यांना मुख्य प्रवाहात सामावून घ्यावे याकरिता महापालिका प्रयत्नशील आहे. येत्या काळात हा सहभाग मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. नागरिकांनी देखील या समूहाला सन्मानाची वागणूक दिल्यास त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हातभार लागेल.