न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ एप्रिल २०२२) :- अधिकृत झोनच्या बाहेर व्यावसाय करणार्या पथारी व्यवसायिकांवर सातत्याने कारवाई करावी, असे आदेश अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी महापालिकेच्या सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.
महापालिका हद्दीतील रस्त्यावर व पदपथांवर व्यवसाय करणार्यांना महापालिका प्रशासनाकडून फेरीवाला प्रमाणपत्र देण्यात आले आहे. तसेच राज्य शासनाच्या धोरणानुसार हॉकर्स झोन तयार करून पथारी व्यवसायिकांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. मात्र, पुनर्वसन केलेले बहुसंख्या व्यवसायिक हॉकर्स झोन सोडून जुन्या ठिकाणी व्यवसाय करत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. कारवाई केल्यानंतर पुन्हा जुन्याच जागेवर बस्तान बसवून व्यावसाय थाटला जातो.
या पार्श्वभूमीवर अतिक्रमण विभागाने महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांना झोन सोडून जुन्या ठिकाणी व्यवसाय करणार्यांवर वारंवार कारवाई करण्याचे लेखी आदेश दिले आहेत. तसेच कारवाईचा दैनंदिन अहवाल देण्याचेही आदेश जगताप यांनी दिले आहेत.