न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ एप्रिल २०२२) :- पवना धरण बंद जलवाहिनी योजनेतील पाइपसह व्हॉल्व, विद्युत जोडणी साहित्याचे ११ वर्षांपासून संरक्षण करणाऱ्या सुरक्षा एजन्सीचे बिले ठेकेदाराने थकविली आहेत. त्यामुळे एजन्सीने काम बंद केल्यानंतर अखेर त्यांना बिलापोटी प्रति महिना २ लाख ९४ हजार रुपये देण्यात येणार आहेत. तसेच १ फेब्रुवारी २०२२ पासून पुढे त्यांच्यासमवेत पवना योजनेतील साहित्य सांभाळण्यासाठी पुन्हा करारनामा केला आहे.
पवना धरणातून बंद जलवाहिनीद्वारे निगडी येथील सेक्टर २३ मधील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत थेट पाणी आणण्याची योजना आखली. या कामासाठी एनसीसी – एसएमसी इंदू या ठेकेदाराला ३० एप्रिल २००८ रोजी कामाचे आदेश दिले. या कामाअंतर्गत ठेकेदाराने मावळात जलवाहिनीसाठी पाईप्स आणून ठेवले. कामाची मुदत दोन वर्षासाठी म्हणजेच २८ एप्रिल २०१० पर्यंत होती. मात्र पवना जलवाहिनीबाबत मावळवासीयांनी विरोधाची भूमिका घेतली. १० ऑगस्ट २०११ रोजी या प्रकल्पाच्या कामाला स्थगिती दिली. आतापर्यंत इंदू यांच्याकडील सुरक्षारक्षकांची एजन्सी मॉर्डन सिक्युरिटी सर्व्हिसेस हे प्रकल्पामध्ये पुरविलेले सर्व साहित्य सांभाळण्याची जबाबदारी घेत होते. ठेकेदार बिलाची पूर्तता करत नसल्याने त्यांनी १४ जानेवारी २०१२ रोजी महापालिकेला दिले. त्यात त्यांनी बिलाची पूर्तता होत नसल्याने १ फेब्रुवारी २०२२ पासून साईटवर सुरक्षारक्षक ठेवणार नाही, असे नमूद केले. त्यामुळे मॉर्डन सिक्युरिटी यांना बिल द्यावे लागणार आहे. मॉर्डन सिक्युरिटी यांच्याबरोबर केलेल्या कामाच्या आदेशाच्या प्रती दिलेल्या आहेत. त्यानुसार प्रति महिना २ लाख ९४ हजार रुपये एवढा खर्च येत आहे. त्यानुसार, मॉर्डन सिक्युरिटी यांना ३ लाख रुपये बिल दिले जाणार आहे.
आतापर्यंत काम १२.६२ टक्के पूर्ण झाले असून त्याला ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ मिळाली. काम चालू असतानाच्या काळात ठेकेदाराने १८०० मिलीमीटर व्यासाचे, १२ मीटर लांबीचे, १० व १२ मिलीमीटर जाडीचे २१६९ लोखंडी पाईप आणि हे पाईप जोडणीसाठी ५८.१७ मीटर लांबीचे स्पेशल आणून ठेवले आहेत. हे पाईप २६.६० एकर क्षेत्रात ठेवले आहेत. या साहित्याचे संरक्षण करण्यासाठी ठेकेदाराने कामाच्या आदेशापासून आतापर्यंत सुरक्षा कर्मचारी नेमले आहेत.












