न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ एप्रिल २०२२) :- मशिदींवरील भोंगे काढण्यात यावेत, असा अल्टिमेटम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. त्यानंतर पिंपरी – चिंचवड पोलीस सतर्क झाले असून, आयुक्तालय स्तरावर ध्वनिप्रदूषण सनियंत्रण समिती स्थापन केली आहे. त्यामुळे ही समिती शहरातील भोंगे काढणार का, अशी चर्चा होत आहे.
भोंगे हटविले नाहीत तर हनुमान चालीसा पठण करणार, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापले. जातीय तणाव वाढून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये म्हणून राज्यभरातील पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. पिंपरी- चिंचवड शहरातील यंत्रणादेखील सतर्क झाली आहे.
मुस्लीमबहुल भागात तसेच मशिदी इदगाह, दर्गा, मदरसे व कब्रस्तान आदींच्या सुरक्षेचा आढावा घेतला जात आहे. ध्वनिप्रदूषण सनियंत्रण समितीमध्ये प्रमुख म्हणून अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे तसेच उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे, मंचक इप्पर, आनंद भोईटे आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी सूर्यकांत डोके यांचा समावेश आहे. कोणत्याही पोलीस ठाण्यात ध्वनिप्रदूषणाबाबतचे गुन्हे दाखल झाल्यास तत्काळ समिती कक्षाला माहिती द्यावी लागणार आहे. याबाबत विशेष शाखेने सर्व पोलीस ठाण्यांना पत्रव्यवहार करण्यास सांगितले आहे.












