न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ एप्रिल २०२२) :- करोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा पुढचा टप्पा म्हणून लहान मुलांसाठी तीन नव्या लशींच्या आपत्कालीन वापराला केंद्रीय औषध महानियंत्रकांनी परवानगी दिली आहे. त्यात भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन, बायोलॉजिकल इच्या कोर्बिव्हॅक्स आणि झायडसच्या झायकोव्ह-डी या तीन लशींचा समावेश आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री मनसुख मंडाविया यांनी ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली. कोव्हॅक्सिन लशीचा वापर सहा ते १२ वर्षे वयोगटातील मुलांसाठी, कोर्बिव्हॅक्स लशीचा वापर पाच ते १२ वर्ष वयोगटातील मुलांसाठी करण्यास केंद्रीय औषध महानियंत्रक कार्यालयाने परवानगी दिली आहे.
झायडस कंपनीतर्फे तयार करण्यात आलेल्या झायकोव्ह डी लशीचा वापर १२ वर्षांवरील मुलांसाठी करणे सुरक्षित असल्याचे चाचण्यांमधून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मुलांना करोना प्रतिबंधात्मक संरक्षण मिळणे आता शक्य होणार आहे.












