- योजनेत उशिरा समावेश होऊनदेखील पालिका कामात अव्वल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ मे २०२२) :- स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शेवटच्या टप्प्यात निवड होऊनही पिंपरी – चिंचवड स्मार्ट सिटीने कामाचा अव्वल दर्जा राखला आहे. पॅन सिटी व एबीडी या प्रकारात सुरू असलेली अनेक कामे पूर्णत्वावर आली आहेत. आतापर्यंत ९० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे पिंपरी – चिंचवड स्मार्ट सिटी सद्यस्थितीत देशात ११ क्रमाकांवर आहे, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश पाटील यांनी बुधवारी (दि. ४) दिली. स्मार्ट सिटी प्रकल्प कामकाजाचा आढावा घेण्यासाठी शहर सल्लागार समिती बैठकीत ते बोलत होते.
स्मार्ट सिटीतील सर्व कामे पूर्ण करून ते प्रकल्प शहरातील नागरिकांसाठी खुली करण्यात येतील, असेही ते म्हणाले. यावेळी आमदार आण्णा बनसोडे, सह मुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण, मुख्य वित्तीय अधिकारी सुनील भोसले, जनरल मॅनेजर (इन्फ्रास्ट्रक्चर) अशोक भालकर, कंपनी सेक्रेटरी चित्रा पवार, कार्यकारी अभियंता मनोज सेठीय, सहायक मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीकांत कोल्हे, निमंत्रित सदस्य गोविंद पानसरे, विद्यार्थी प्रतिनिधी दीपक पवार, सिटीझन फोरमचे तुषार शिंदे उपस्थित होते.
त्यासोबतच पॅन सिटी व एबीडी प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या कामांच्या प्रगतीबाबत सल्लागारांमार्फत सादरीकरणकरण्यात आले. स्मार्ट सिटीला वेगवेगळे तीन पुरस्कार मिळाल्याने आयुक्त व त्याच्या पथकाचे अभिनंदन करण्यात आले.
स्मार्ट सिटीचे विविध प्रकल्प प्रगतिपथावर म्युनिसिपल ई – क्लासचे २३ पैकी २१ कंम्पोनंट पूर्ण असून ८० टक्के काम झाले आहे. सिटी कमांड अॅण्ड कंट्रोल सेंटरचे काम प्रगतीपथावर आहे. एबीडी प्रकल्पांतर्गंत रस्त्यांचे ८५ टक्के काम मार्गी लागले आहे. स्मार्ट बस स्थानक उभारले जात आहेत. स्मार्ट पार्कींग व्यवस्था, सिनिअर सिटीझन प्लाझा, योगा पार्कची कामे देखील प्रगतीवर आहेत. व्हीएमडीपासून तीन लाखाचे उत्पन्न मिळाले आहे. ऑप्टीकल फायबर केबल ५८५ पैकी ५३७ किलोमीटर अंतर टाकण्यातआली असून, ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. २७० ठिकाणी वायफाय बसविण्यात आले आहे. पोल उभारण्याचे काम झाले आहे. सिटी सर्व्हेअन्स अंतर्गत शहरात नेमून दिलेल्या जागेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहे. स्मार्ट ट्राफिकचे १२२ कॅमेरे बसविले आहे. स्मार्ट पर्यावरण मशीन, स्मार्ट वॉटर मीटर, स्मार्ट सेव्हरेज, सॉलीड वेस्ट मॅनेजमेंट आदी स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पाची कामे वेगाने सुरू आहेत, अशी माहिती सल्लागार प्रतिनिधींनी दिली.