- माजी आ. गौतम चाबुकस्वार यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ मे २०२२) :- पिंपरी-चिंचवड शहराचे माजी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केलेल्या भ्रष्टाचाराविषयी एक पत्र व्हायरल झाले आहे. या पत्रामध्ये पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी शहरामध्ये कोणकोणता भ्रष्टाचार केला? याविषयीची माहिती दिली आहे. याबाबत माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी आज पिंपरीत पत्रकार परिषद घेतली.
ते म्हणाले, काही वर्तमान पत्रांमधून व समाज माध्यमातून याबाबत बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. पत्रामध्ये गंभीर स्वरूपाचे भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आलेले आहेत. याविषयी पिंपरी चिंचवड शहरामध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. नागरिकांमध्ये मोठया प्रमाणावर पोलीस खात्याविषयी संताप व्यक्त होत आहे. परंतु या प्रकरणाचे पुढे काय होणार याची उत्सुकता नागरिकांमध्ये जागृत झाली आहे. म्हणून या प्रकरणाची कोंडी फोडण्याची आणि झालेल्या भ्रष्टाचाराची प्रकरणे नागरिकांसमोर यावी या दृष्टीकोनातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री तसेच रजनीश शेठ पोलीस महासंचालक यांना त्या संदर्भात कृष्ण प्रकाश यांची चौकशी करावी अशा प्रकारचे निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे, २०० कोटी रूपयांचे वसुलीचे पत्र ज्या सहा. पोलीस निरिक्षक डॉ. अशोक डोंगरे यांच्या नावाने व्हायरल झाले आहे. त्याची नार्कोटेस्ट करावी, त्यामुळे संपुर्ण सत्य बाहेर येईल. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी जमीनीच्या व्यवहारात मध्यस्थी केल्याच्या अनेक तक्रारी यापूर्वी आलेल्या आहेत. त्यामुळे हया पत्रातील मजकूर हा सत्य असल्याचा संशय आहे.
त्यामुळे या व्हायरल पत्राची चौकशी सी.आय.डी. अथवा स्वतंत्र सचिव दर्जाचा अधिकारी यांच्या मार्फत करावी व संबंधित पोलीस अधिकारी, सामाजिक
कार्यकर्ते व पत्रकार यांची व त्यांच्या बेहिशेबी मालमत्तेची चौकशी करावी, असे या निवेदनात चाबुकस्वार यांनी म्हटले आहे.