- हजारो हरकती सूचनांना आयोगाकडून केराची टोपली..
- केवळ आठ प्रभागांची डागडुजी; बाकी जैसे थे…!
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मे २०२२) :- सर्वोच्च न्यायालयाने नुकताच आदेश देऊन निवडणूक जाहीर करण्यास सांगितल्याने राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त यु.पी.एस. मदान यांनी पिंपरी चिंचवड पालिकेची अंतिम प्रभाग रचना आज जाहीर केली. आठवड्याने आरक्षण जाहीर होणार असल्याने कोण कोठून उभे राहणार हे सुद्धा जवळपास नक्की होणार आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेची प्रभाग रचना आज शुक्रवारी जाहीर झाली. त्यामुळे इच्छुकांचा तयारीला लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पालिकेने पाठवलेल्या प्रारूप प्रभाग रचनेच्या आराखड्यात ४६ पैकी फक्त आठ प्रभागांच्या रचनेत किरकोळ बदल आयोगाने केला आहे.
दरम्यान, आयोगाने या निवडणुका पावसाळ्यानंतर घेण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयात केली आहे. त्यावर १७ तारखेला सुनावणी आहे. तेव्हाच ही निवडणूक कधी होणार हे स्पष्ट होणार आहे. तीन सदस्यीय पद्धतीने निवडणूक होणार असल्याने प्रभागांची संख्या ४६ वर गेली आहे. त्यातील शेवटचा ४६ नंबरचा प्रभाग हा चार सदस्यीय आहे. त्यामुळे सर्वात मोठा म्हणजे मतदारसंख्या सर्वाधिक (४६, ९७९) असलेला प्रभाग आहे.
भाजपकडून हरकतींचा पाऊस पडला होता. पाच हजार ६८४ हरकती घेण्यात आल्या. त्यावर सुनावणी घेऊन ती अंतिम करण्यासाठी २ मार्चला राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आली होती.
बदल झालेले प्रभाग :-
१. प्रभाग क्रमांक २ – चिखलीगावठाण, मोरेवस्ती, कुदळवाडी (पूर्वीची लोकसंख्या ३३ हजार ६५३ होती, आता ३२ हजार १३१) असणार आहे.
२. प्रभाग क्रमांक ३ – बो-हाडेवाडी, जाधववाडी (पूर्वी लोकसंख्या ३७ हजार ६७१ होती, आता ३६ हजार ७१८) असणार आहे.
३. प्रभाग क्रमांक ५ – च-होली, चोविसावाडी, वडमुखवाडी (पूर्वी लोकसंख्या ३९ हजार ९७० होती. आता ३४ हजार ८१६) असणार आहे.
४. प्रभाग क्रमांक ७ – सँण्डविक कॉलनी, रामनगर (पूर्वी लोकसंख्या ३७ हजार ९७ होती. आता ४२ हजार २५१) असणार आहे.
५ . प्रभाग क्रमांक ११ – गवळीमाथा, बालाजीनगर (पूर्वी लोकसंख्या ३७ हजार ३६० होती. आता ३८ हजार ३१३) असणार आहे.
६. प्रभाग क्रमांक १२ – घरकुल, नेवाळे वस्ती, हरगुडे वस्ती (पूर्वी लोकसंख्या ३४ हजार ४१८ होती. आता ३५ हजार ९१०) असणार आहे.
७. प्रभाग क्रमांक २६ – बिजलीनगर, दळवीनगर, भोईरनगर, चिंचवडेनगर (पूर्वी लोकसंख्या ३७ हजार ४२० होती. आता ३९ हजार ६००) असणार आहे.
८. प्रभाग क्रमांक २७ – चिंचवडगाव, उद्योगनगर, प्रेमलोक पार्क, प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह (पूर्वी लोकसंख्या ३८ हजार ७२७ होती. आता ३६ हजार ५४७) असणार आहे.