न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मे २०२२) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने आरोग्यसेविकेच्या ८८ पदासाठी ११ महिने कंत्राटी पद्धतीने मानधनावर भरती केली जाणार आहे. त्यासाठी तब्बल १ हजार ८०० महिलांनी मुलाखतीसह आवश्यक कागदपत्रे सादर केली. काही तांत्रिक कारणांमुळे ही भरती प्रकिया मागील महिन्यात अचानक रद्द करण्यात आली होती. ती भरती प्रक्रिया पुन्हा १७ ते १९ मे अशी तीन दिवस चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात घेण्यात आली.
एकूण ८८ पदासाठी तब्बल १ हजार ८०० महिलांनी मुलाखत दिली. राज्यभरातील विविध जिल्ह्यातील महिला मुलाखतीसाठी आल्या होत्या. तसेच त्यांच्याकडून आवश्यक कागदपत्रे घेण्यात आली आहेत. त्यामुळे मोरे प्रेक्षागृहात आवारात गेले तीन दिवस मोठी गर्दी झाली होती. या मुलाखती रात्री उशीरापर्यंत सुरू होत्या. कागदपत्रांची छाननी करून अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे.
या संदर्भात अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन सावळे यांनी सांगितले की, महापालिकेच्या नियमानुसार आरोग्यसेविका पदासाठी मुलाखत घेण्यात आली आहे. आयुक्त राजेश पाटील यांची मान्यता घेऊन लवकरच अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.