- दस्तनोंद होताच एका क्लिकवर मिळकतीची माहिती पालिकेला मिळणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मे २०२२) :- पुणे व पिंपरी – चिंचवड शहरातील नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडे मालमत्तेची दस्तनोंद झाल्यानंतर ती माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागास दिली जाणार आहे. शहरात सहा नोंदणी कार्यालये आहेत. त्यासाठी नोंदणी विभाग व महापालिका या दोन्हीकडील संगणक प्रणाली संकेतस्थळाद्वारे एकमेकांना जोडण्यात येत आहे. त्यासाठी प्रणाली अद्ययावत करण्यात येत आहे. त्यामुळे पिंपरी – चिंचवड शहरातील कोणतीही दस्तनोंद झाल्यास ती लगेच पालिकेच्या कर संकलन विभागास समजणार आहे. त्याद्वारे महापालिका मिळकतकराची परस्पर आकारणी करणार आहे. त्या प्रकारची अद्ययावत संगणक प्रणाली स्वीकारण्यात येत आहे.
महापालिकेकडे दरवर्षी सरासरी २५ हजार नव्या मिळकतींची नोंद होते. नोंदणी व मुद्रांक विभागाकडे शहरातील मिळकतींची दस्तनोंदनी संख्या एका वर्षाला सुमारे ५० हजार आहे. दस्तनोंदीप्रमाणे मिळकत नोंदविली जात नसल्याचे चित्र आहे. दस्तनोंदीनंतर तत्काळ मिळकतकर लागू झाल्यास मिळकत लपविण्याच्या प्रकारास कायमचा आळा बसणार आहे. तसेच, पालिकेस मिळकतींचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र मोहिम राबवावी लागणार नाही. परिणामी, पालिकेचीही सर्वेक्षणावर होणाऱ्या मोठ्या खर्चात बचत होणार आहे.
नव्या पद्धतीमुळे दस्तनोंद झालेल्या मिळकतींची लगेच मिळकतकरासाठी नोंदणी होणार आहे. त्यामुळे त्या मिळकतींना पालिकेच्या रजिस्टरमध्ये नोंद होऊन तत्काळ मिळकतकर लागू होणार आहे. संकलन कार्यालयाकडे नागरिकांना नव्याने मिळकत नोंदणीसाठी धावाधाव करावी लागणार नाही. नोंदणी व विलंब दंडातून त्यांची सुटका होणार आहे. त्यातून आर्थिक दिलासा मिळणार आहे.
राज्यात मुंबई शहरानंतर इतर १४ मोठ्या शहरांत नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभाग नवीन पद्धत सुरू करीत आहे. त्यामुळे नोंदणी विभाग व संबंधित महापालिकेत समन्वय राहणार आहे. परिणामी, पालिकेपासून कोणत्याही मिळकतींची नोंद लपविता येणार नाही. यासंदर्भात संबंधित विभागाशी बैठका झाल्या आहेत.
– नीलेश देशमुख, सहायक आयुक्त…