- ३१ मे ला आरक्षण सोडत तर, १ जूनला प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप होणार प्रसिद्ध….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मे २०२२) :- पुणे, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई, वसई – विरार, कल्याण डोंबिवली, कोल्हापूर, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, सोलापूर, अमरावती, अकोला व नागपूर या १३ महानगरपालिकांचा आरक्षण व सोडत कार्यक्रम सोमवारी (दि. २३) रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.
त्यानुसार अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) व सर्वसाधारण (महिला) यांच्या आरक्षित जागा निश्चितीसाठी सोडतीची (मराठी) व (इंग्रजी) मधील नमुन्यात २७ मे शुक्रवारी रोजी जाहीर नोटीस प्रसिध्द करण्यात येणार आहे.
अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) सर्वसाधारण (महिला) यांच्याकरिता मंगळवारी (दि. ३१) रोजी आरक्षित जागा निश्चित करण्यासाठी सोडत काढण्यात येणार आहे.
सोडतीनंतर १ जून रोजी प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप प्रसिध्द होणार आहे. प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना १ जून ते ६ जून या कालावधीत दाखल कराव्यात. आरक्षण निश्चितीबाबत प्राप्त झालेल्या हरकती व सुचनांवर विचार करुन प्रभागनिहाय अंतिम आरक्षण १३ जुन रोजी शासन राजपत्रात प्रसिध्द होणार आहे, असे राज्य निवडणूक आयोगचे सचिव किरण कुरुंदकर यांनी आदेशात म्हटले आहे.