- पोलिसांचा छापा; पाच जणांना अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मे २०२२) :- स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी संगनमत करून बनावट कागदपत्रे तयार केली. ते खरे असल्याचे दाखवून त्याद्वारे बनावट सिम कार्ड घेतले. या सिमकार्डद्वारे आरोपी सरकारने बंदी घातलेला बेटींगचा व्यवसाय करत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्यानुसार, पोलीसांनी छापा टाकून आरोपींना जेरबंद केले.
त्यांच्याकडून वेगवेगळ्या कंपन्यांचे ३० मोबाईल, तीन लॅपटॉप, रोकड, मोबाईल फोन पेटी, पैसे मोजायची मशिन, हिशोबाच्या डायऱ्या असा ५ लाख ३१ हजार रूपये किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला. पिंपळे-सौदागर येथे मालपाणी इस्टेटमध्ये करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक अमरिश देशमुख तपास करत आहेत.
गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस नाईक मोहम्मद नदाफ यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विनोद उर्फ बाळू बळीराम अग्रवाल (वय ४४, रा. मालपाणी इस्टेट, पिंपळे-सौदागर), सनी जगदिश मंगलानी (वय ३२, रा. पीडब्ल्युडी, पिंपरी), हितेश पुरण लोहाना (वय ३०, रा. कापसे हाईटस, पिंपरी), रोहित उर्फ सोनू कैलास अग्रवाल (वय २१) आणि शुभम अजय जहागिरदार (वय २८, दोघे रा. मालपाणी इस्टेट, पिंपळे-सौदागर) अशी अटक केलेल्या पाच जणांची नावे आहेत.