न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ फेब्रु.) :- सत्ताधारी भाजपने महापालिका सभेत कोणतीही चर्चा न करता रुग्णालय खासगीकरणास मंजुरी दिली आहे. आजपर्यंतच्या अनुभवानुसार खासगी संस्था या नफा कमविण्यासाठी मोफत सेवा बंद करतात. याविरोधात तसेच महापालिकेच्या वतीने अनधिकृत घरांवर आकारण्यात येत असलेला शास्तीकर रद्द करण्यात यावा व शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यात यावेत, यासाठी समाजवादी पक्षाच्या वतीने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर सोमवार (दि. ११) रोजी धरणे आंदोलन करण्यात आले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील विविध समस्या सोडविण्याचे शहरवासीयांना आश्वासन दिले होते. त्या आश्वासनांचा सत्ताधाऱ्यांना विसर पडलेला आहे. त्याच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष रफिक कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले होते.
यात बी. डी. यादव, सालार शेख, राजू तावडे, इस्लामुद्दिन अन्सारी, मोहसीन शाह, रवी यादव, मुख्तार पठाण, नरेंद्र पवार, साजिद शेख, विकास वाघमारे, महिला आघाडी अध्यक्षा वहिदा शेख, साधना तिवारी, योगिता शिंदे, तस्लिमा खान, रिजवान शेख आदी कार्यकर्ते व पदाधिकारी या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.











