न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मे २०२२) :- पिंपरी – चिंचवड शहरातील तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महापालिकेच्या मिळकतीच्या संरक्षणासाठी त्यांची रखवालदार आणि ग्रीन मार्शल पथकात नियुक्ती करण्यात येणार आहे. तीस जणांच्या नियुक्तीस महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी शुक्रवारी (दि. २७) मंजुरी दिली.
पहिल्या सहा महिन्यांसाठी प्रायोगिक तत्वावर त्यांना काम देण्यात येणार आहे. त्यासाठी चार ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडून प्रत्येकी दोन क्षेत्रीय कार्यालयाप्रमाणे रखवालदार घेण्यात येणार आहे.
अ व फ क्षेत्रीय कार्यालयासाठी एम के फॅसिलिटीज यांच्याकडून ८ तृतीयपंथी रखवालदार घेण्यात येणार आहेत. तर, ब व ग क्षेत्रीय कार्यालयासाठी नॅशनल सिक्युरिटी सव्र्हींसेस ८, क व ई क्षेत्रीय कार्यालयासाठी सैनिक इंटेलिजन्स अँड सिक्युरिटी ७ व क्रिस्टल इंटेग्रेटेड सर्व्हसेस यांच्याकडून ७ रखवालदार घेण्यात येणार आहे. नवीन किमान वेतन कायद्यानुसार प्रत्येक कर्मचाऱ्याला २४ हजार २९२ रुपयांप्रमाणे वेतन देण्यात येणार आहे. त्यानुसार सहा महिन्यांसाठी ३० कर्मचाऱ्यांवर एकूण ४३ लाख ७२ हजार ५६० रुपये पालिका खर्च करणार आहे. सुरक्षा विभागाच्या या प्रस्तावाला आयुक्त पाटील यांनी मान्यता दिली.