- पालिकेच्या अग्निशमन दलात सहा फायर बाईक सामील…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मे २०२२) :- गेल्या काही दिवसांत पिंपरी चिंचवड शहरात आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्या साठी फायर बाइक अग्निशमन दलाच्या ताफ्यात दाखल करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता.
अग्निशामक दलाच्या ताफ्यात सहा फायर बाइक दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलात फायर बाईक सामील झाल्याने गल्लीबोळातील आगीवर नियंत्रण मिळवणे आता लवकर शक्य होणार आहे. तसेच दाटीवाटीने वसलेल्या वस्तीत लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवत वित्त व जीवितहानी टाळणे शक्य होणार आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील अवैध बांधकामांमुळे रस्ते अरूंद झाले आहेत. अशा ठिकाणी आग लागल्यास आग शमविताना अग्निशामक दलास तारेवरची कसरत करावी लागते. यावर उपाय म्हणून फायर बाइक एक चांगला पर्याय मानला जातो. सध्या या फायर बाइकची पासिंगची प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतरच याबाईक प्रत्यक्षात फिल्डवर उतरणार असल्याचे अग्निशामक दलाच्या सूत्रांनी सांगितले .
या बाईक्सवर दोन्ही बाजूला पाण्याच्या छोट्या टाक्या असतील. इनबिल्ट इंजिनमुळे घटनास्थळी असलेल्या पाण्याच्या टाक्यांमधून पाणी खेचून फवारा करता येणार आहे. गाडीवरच पाण्याची सोय असल्यामुळे अडगळीच्या ठिकाणी पाठीवरून पंप नेण्याची गरज भासणार नाही. अग्निशमन दलाचे दोन जवान या बाइकवरून जावू शकणार आहेत. बाइकवर सायरन, वायरलेस संपर्क यंत्रणा उपलब्ध आहे.