- सकाळी ११ नंतर पालिका निवडणुकीचे चित्र होणार स्पष्ट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मे २०२२) :- आगामी महापालिका निवडणुकांसाठी महिलांच्या आरक्षित जागांची सोडत मंगळवारी (३१ मे) सकाळी ११ वाजता चिंचवडच्या रामकृष्ण मोरे नाटय़गृहात काढण्यात येणार आहे. या सोडतीवर बरीच राजकीय गणिते अवलंबून असल्याने त्याविषयी राजकीय वतुर्ळात उत्सुकता दिसून येते.
पिंपरी पालिकेचे प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांच्या उपस्थितीत सोडतीचा कार्यक्रम होणार आहे. त्यादृष्टीने प्रशासकीय तयारी तसेच रंगीत तालीमही झाली आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठय़ा काढण्यात येणार असून संपूर्ण सोडत प्रक्रियेचे चित्रीकरण केले जाणार आहे. सोडतीविषयीची सविस्तर माहिती प्रसिध्दिपत्रकाद्वारे पालिका मुख्यालय, क्षेत्रीय कार्यालये, जाहिरात फलक, केबल टीव्ही आदींच्या माध्यमातून शहरवासीयांपर्यंत पोहोचवली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
पिंपरी महापालिकेच्या नगरसेवकांची संख्या १३९ असणार आहे. तीन सदस्यीय प्रभाग पध्दतीनुसार ४५ प्रभाग होणार असून सांगवीचा प्रभाग मात्र चार सदस्यीय असणार आहे. १३९ सदस्यांपैकी ६९ पुरूष आणि ७० महिला सदस्य असणार आहेत. तीन जागा अनुसूचित जमातीसाठी, २२ जागा अनुसूचित जातींसाठी राखीव असणार आहेत. तर, खुल्या प्रवर्गातून ११४ जागांवर निवडणुका होतील.