न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी : भोसरीतील महात्मा फुलेनगर व लांडेवाडी परिसरातील झोपडपट्टीत अवैधरित्या काळे धंदे सुरु असून पोलीस प्रशासनाचा यावर वाचक नसल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत आहेत. या परिसरामध्ये गेली अनेक वर्षांपासून गावठी हातभट्टी दारू, ताडी विक्री, मटका व्यवसाय, सोरट, जुगार व गांजा विक्री असे मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरु आहेत. याप्रकारामुळे वस्तीमध्ये भांडणे, मारामारी व गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे.
या प्रकारास आळा बसावा याकरिता शिवसेना पिंपरी विधानसभेच्या वतीने दिनांक २१/०८/२०१८ रोजी पोलीस उपआयुक्त परिमंडळ-१चे मकरंद रानडे यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले होते, परंतु संबंधीतांवर केवळ जुजबी नाममात्र कारवाई करण्यात आली.
या अवैध धंद्यांविरोधात परिसरात कोणीही आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीला दहशत व दडपशाही चा धाक दाखवून धमकाविण्यात येते. या परिसरात प्रामुख्याने आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांचे वास्तव्य आहे. या अवैध धंद्याच्या आहारी गेल्याने अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत.
सर्वसामान्य नागरिक व महिला वर्गामध्ये या अवैध धंद्याविरोधात कमालीचा असंतोष असून ते कायदा हातात घेण्याआधी आपण योग्य ती कारवाई करावी अन्यथा वस्ती मधील नागरिकांच्या वतीने व शिवसेना पद्धतीने जनआंदोलन करण्यात येईल. अशी मागणी शिवसेना पिंपरी विधानसभेचे शहर संघटक जितेंद्र ननावरे यांनी पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्याकडे केली आहे.
















