न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जून २०२२) :- हरयाणा येथे होणाऱ्या खेलो इंडिया युथ गेम्स कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या टीममध्ये पिंपरी चिंचवड महापालिका शाळेतील मनीषा राठोड या विद्यार्थिनीची निवड झाली. महापालिकेच्या थेरगाव माध्यमिक विद्यालयाची मनीषा राठोड ही विद्यार्थिनी आहे. याच शाळेतील शिक्षिका सोनाली जाधव यांची सहायक व्यवस्थापक महाराष्ट्राच्या संघासाठी नियुक्ती केली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका कला क्रीडा विकास प्रकल्पांतर्गत खेळणारी कुमारी मनीषा राठोड ही महाराष्ट्र राज्यातील मुलींच्या कबड्डी संघात प्रथमच पात्र ठरली आहे. ऑल राउंडर म्हणून कबड्डीसाठी १९ वर्षांखालील मुली गटात महाराष्ट्र खेळाडू संघात निवड झालेली ती प्रथम खेळाडू आहे.
हरयाणासाठी मुलींचा कबड्डी संघ १ जूनला रवाना होणार आहे. चौथ्या खेलो इंडिया युथ गेमचे आयोजन दि. ३ ते १३ जून या कालावधीत येथे होत आहे. मनीषा राठोडला बन्सी आटवे यांचे प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन लाभले. या निवडीबद्दल महापालिकेच्या सहायक आयुक्त सुषमा शिंदे, क्रीडा अधिकारी श्रीमती अनिता केदारी व माध्यमिक विद्यालय थेरगावचे मुख्याध्यापक चंद्रशेखर कदम यांनी मनीषा राठोडचा गौरव केला. निवड झालेल्या सोनाली जाधव यांची कर्नाटकमध्ये २०१९-२०२० मध्ये राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या मार्गदर्शक म्हणून नेमणूक झाली होती. तेव्हा महाराष्ट्र राज्य संघ कास्यपदक विजेता ठरला होता.