- ऐच्छिकरित्या खासगी वाहन वापरण्यास आयुक्तांकडून हिरवा कंदील…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जून २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अधिकाऱ्यांसाठी सुधारित वाहन धोरण निश्चित करण्यात आले आहे. या नवीन धोरणानुसार महापालिकेतील अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजासाठी स्वतः ची खासगी कार वापरता येणार असून यासाठी दरमहा सुमारे ३५ हजार रूपये इंधनासाठी देण्यात येणार आहेत.
पिंपरी – चिंचवड महापालिकेत वर्ग -१ च्या अधिकाऱ्यांना पालिकेच्या वतीने कार्यालयीन कामकाजासाठी कार देण्यात येते. सध्यस्थितीत अधिकाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्या तुलनेत मोटारींची संख्या कमी असल्यामुळे ठेकेदारामार्फत मोटारी भाडे तत्वावर घेण्यात येतात. मात्र, या मोटारी पिवळ्या क्रमाकांच्या असतात. बहुतांश शासकीय कार्यालये ही पुणे महापालिका हद्दीमध्ये आहेत. या मोटारी अनेकवेळा ना दुरूस्त होण्याचे प्रमाणही अधिक आहे. काही दिवसांपूर्वी दोन अधिकाऱ्यांना महत्वाच्या बैठकींना जात असतानाच वाहने मध्येच बंद पडली होती. या अधिकाऱ्यांना रस्त्यातच या गाड्या सोडून देऊन दुसरे वाहनाने इच्छित स्थळी जावे लागले होते. या सर्व प्रकारामुळे अधिकाऱ्यांना चांगलाच मनस्ताप झाला.
पिंपरी महापालिकेचे काही अधिकारी पुण्यात वास्तव्यास आहेत त्यांना पुणे महापालिका हद्दीमध्ये वाहन नेण्यास परवनागी नव्हती. त्यामुळे सुधारित वाहन धोरण करण्याची अनेक अधिकाऱ्यांची मागणी होती. या अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजासाठी तसेच कार्यक्रमस्थळी येण्या – जाण्यासाठी वाहन गरजेचे आवश्यक आहे. वाहन धोरण निश्चित करण्यासाठी आयुक्तांच्या उपस्थितीत नुकतीच बैठक झाली. वर्ग -१ ज्या अधिकाऱ्यांना वाहन मंजूर आहे आणि त्यांनी ऐच्छिकरित्या खासगी वाहन वापराबाबत परवानगी मागितली होती. अशा अधिकाऱ्यांना खाजगी वाहन वापर खर्च म्हणून इंधनासाठी दरमहा सुमारे ३५ हजार रूपये देण्यात येणार आहेत.