- शहरातील २३ कोटी १७ लाखांच्या खर्चास प्रशासकांची मंजुरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जून २०२२) :- पुणे महानगर परिवहन महामंडळास सन २०२१-२२ या वर्षातील संचलन तुटीपोटी देण्यात येणाऱ्या १६ कोटी रुपये खर्चासह स्थायी समिती आणि विधी सभेची मान्यता आवश्यक असलेल्या सुमारे २३ कोटी १७ लाख रुपये खर्चाच्या विविध विषयांना बैठकीत प्रशासक राजेश पाटील यांनी मंजुरी दिली. प्रशासक राजेश पाटील यांच्या उपस्थितीत महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीत पार पडलेल्या बैठकीस विषयाशी संबंधित अधिकारी आणि विभागप्रमुख उपस्थित होते.
विधी समितीची मान्यता आवश्यकता असलेल्या विषयांना देखील प्रशासक पाटील यांनी मंजुरी दिली. यामध्ये अनधिकृत भंगार व्यावसायिक, गोडावूनचे अग्निशमन आणि फवारणी यांच्या कामकाजा करिता सेवाशुल्क आकारणीकामी तसेच अग्निशामक विभागातील कर्मचाशमन यांचे विविध अग्निप्रशिक्षण पाठ्यक्रमांकरिता धोरण ठरविण्याकामी महापालिका सभेच्या मान्यतेसाठी शिफारस करणे आदी विषयांचा समावेश होता.
स्थायी समितीची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांना झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. निगडी ते दापोडी दरम्यान बीआरटीएस कॉरीडॉर क्र.१ समर्पित मार्ग आणि बसस्थानक देखभाल दुरुस्तीकामी येणा-या १ कोटी १२ लाख खर्चास यावेळी मान्यता देण्यात आली. मौजे किवळे, मौजे रावेत, मौजे मामुर्डी येथील पवना नदीलगत सर्व्हे नंबरची मोजणी फी अदा करण्यास येणाऱ्या १८ लाख रुपये खर्चास, पिंपळे निलख येथील रक्षक सोसायटीचा मलजोड मनपाच्या मलवाहिनीस जोडण्याकामी १६ लाख ४८ हजार रुपये खर्चास, भोसरी २१७ पंप हाऊस येथे अतिरिक्त वीजभार मिळण्याकामी वीज वितरण कंपनीस शुल्कापोटी द्यावयाच्या १२ लाख ६७ हजार रुपये खर्चास प्रशासक राजेश पाटील यांनी झालेल्या बैठकीत मंजूरी दिली.
चिंचवड येथील मैलाशुध्दीकरण केंद्रा अंतर्गत प्रभाग क्र. १४ मधील काळभोरनगर, मोहननगर आणि इतर परिसरातील जलनि:सारण व्यवस्थेमध्ये सुधारणा करणे आणि उर्वरित ठिकाणी जलनि:सारण नलिका टाकण्यासाठी येणा-या २४ लाख रुपये खर्च होणार आहे. प्रभाग क्र. १२ मधील त्रिवेणीनगर, ताम्हाणेवस्ती, सहयोगनगर परिसरातील जुन्या जलनि:सारण व्यवस्थेमध्ये आवश्यकतेनुसार सुधारणा करण्यासाठी २८ लाख ९१ हजार रुपये खर्च होतील. पिंपरी चिंचवड शहराच्या हद्दीतील पवना, इंद्रायणी आणि मुळा या नद्यांमधील जलपर्णी काढण्यासाठी ४३ लाख रुपये खर्च होईल. क क्षेत्रीय कार्यालयांतर्गत जाधववाडी मोशी येथील प्रभाग क्र. २ मधील अंतर्गत रस्ता रुंदीकरण कामास अडथळा ठरणा-या उपस्कर वाहिन्या आणि खांब हलविण्यासाठी येणा-या १ कोटी १५ लाख रुपये खर्च होणार आहेत. कोवीड १९ जैव वैद्यकीय कचरा गोळा करण्यास आणि त्याची शास्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावण्यासाठी येणा-या ९ लाख ९८ हजार रुपये खर्चासदेखील प्रशासक राजेश पाटील यांनी आज झालेल्या बैठकीत मान्यता दिली.