- मात्र, ओळखपत्राच्या लेसवरून पालिका आवारात रंगीबेरंगी चर्चा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जून २०२२) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी कसेही ओळखपत्र तयार करून वापरत असल्याने बेशिस्ती वाढली होती. त्याला आळा घालून रोख लावण्यासाठी केवळ अधिकृत व एकसारखी ओळखपत्र बाळगण्याचा नियम करण्यात आला. मात्र, अ, ब, क आणि ड या वर्गानुसार अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिलेल्या ओळखपत्रास वेगवेगळ्या रंगाचे फित (लेस) असल्याने महापालिका वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगली आहे.
पालिकेचे कर्मचारी कोणी कशाही प्रकारे ओळखपत्र लावून पालिका भवन, क्षेत्रीय कार्यालयात व इतर ठिकाणी वावरत होते. बोगस ओळखपत्र तयार केल्याच्या तक्रारी पालिका प्रशासनाला आढळून आल्या. तसेच, निवृत्त कर्मचाऱ्यांना ओळखपत्र नसल्याने अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता. त्याकरीता तत्कालिन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी १८ सप्टेंबर २०१९ ला नियमावली तयार केली. पूर्वी दिली जाणारी ओळखपत्राची फित ही अधिकारी व कर्मचारी या सर्वासाठी निळ्या रंगाची होती. आता त्यात बदल करण्यात आला आहे.
अ, ब, क आणि ड वर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ओळखपत्रासाठी वेगवेगळ्या रंगाची फित देण्यात आली आहे. वर्ग ‘ अ ‘ च्या अधिकाऱ्यांना निळ्या रंगाच्या फिती आहे. वर्ग ‘ ब ‘ आणि ‘ क ‘ च्या अधिकारी कर्मचाऱ्यांना गडद जांभळ्या रंगाची फित आहे. तर , वर्ग ‘ ड ‘ च्या कर्मचाऱ्यांसाठी गडद हिरव्या रंगाची फित देण्यात आली आहे. सुमारे ८ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांना ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी वेगवेगळ्या रंगाची फित असल्याबद्दल आश्यर्च व्यक्त केले जात आहे. त्याबाबत महापालिका वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगली आहे.