परिसराची स्वच्छता, पाण्याची व्यवस्था
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जून २०२२) :- दोन वर्षांनी यंदा आषाढी पालखी सोहळा होणार असल्याने आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात वारकऱ्यांच्या स्वागताची प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरु आहे. श्री संत तुकाराम महाराज याचा पालखी सोहळा हजारो वारकऱ्यांसमवेत शहरात दाखल होतो. हा पालखी सोहळा परंपरेनुसार आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात मुकामी असतो.
आकुर्डीतील विठ्ठल मंदिर हे वतनवारी पद्धतीने कुटे कुटुंबीयांकडे आहे. हे शिवकालीन मंदिर असल्याचे सांगितले जाते. संत तुकाराम महाराज पायी वारी करत त्यावेळी महिला मुकाम येथील विठ्ठल मंदिरात करत असत. त्यामुळे पालखी सोहळ्याचा मुक्काम याठिकाणी असतो. वारकऱ्यांच्या सेवेसाठी कुटे नाही तर शहर पसिरातील सर्व नागरिकांचा सहभाग असतो, असे असे मंदिराचे विश्वस्त गोपाळ कुटे यांनी सांगितले.
पालखी सोहळ्यासाठी महापालिकेकडून मंदिर व परिसराची स्वच्छता, पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिराच्या शेजारी मोठे शेड बांधले आहे. त्यामध्ये दर्शन रांग तयार केली आहे. तसेच स्वतंत्र खोल्यांची देखील व्यवस्था आहे. वारकरी दरवर्षी ठरल्याप्रमाणे ओळखीच्या घरी विसावा घेतात. शहरवासीय देखील वारक-यांचे पाहुण्यांप्रमाणे प्रेमभावाने आदरातिथ्य करतात. तसेच नेहमीप्रमाणे मनपा शाळांमध्ये देखील काही वारकऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सोहळ्यादरम्यान कोठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मंदिरामध्ये ३२ सीसीटीव्ह कॅमेरे लावण्यात आले आहेत.
महापालिकेकडून यासाठी एक व्हॅन देण्यात आली आहे. ज्यामध्ये मंदिर परिसरात लावलेल्या कॅमेऱ्यांचे फुटेज दिसणार आहे. सोहळा आल्यानंतर सायंकाळी सात वाजता आरती केली जाते. दरवर्षी कुटे कुटुंबीयांकडून वारकऱ्यांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येते. त्यांनंतर रात्री दहा वाजता, दोन वाजता आणि पहाटे चार वाजता आरती केली जाते. त्यानंतर पहाटे विठ्ठल रुक्मिणीची महापूजा करून पालखी मार्गस्थ होते. पालखी सोहळा मार्गस्थ होईपर्यंत पालिकेकडून आकुर्डी परिसरात सलग पाणी पुरवठा केला जाणार आहे.















