- बंडखोर आमदार अधिवेशनाला लावणार उपस्थिती..
- शिवसेनेची भिस्त आता सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपाकडे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जून २०२२) :- राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याच्या विधानसभेचे सचिवांना ३० जून रोजी विशेष अधिवेशन घेण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधातील विश्वासदर्शक ठराव या एकमेव उद्देशासाठी हे अधिवेशन बोलावण्यात यावे असं राज्यापालांनी पाठवलेल्या पत्रात म्हटल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार अल्पमतात आल्याने सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगावे, अशी मागणी करणारे पत्र भाजपाने मंगळवारी रात्री राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सादर केले होते. शिंदे यांच्या बंडानंतर भाजपाने प्रथमच या राजकीय लढाईत उडी घेतल्याचं दिसून आलं.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी दिल्लीत भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेऊन रात्री मुंबईत परतले. त्यानंतर फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. ‘‘शिवसेनेच्या ३९ आमदारांनी वेगळी भूमिका घेतली आहे. याशिवाय काही अपक्षांनी शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. ४६ आमदारांनी वेगळी भूमिका घेतल्याने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने बहुमत गमावले आहे. त्यामुळे सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगावे,’’ अशी मागणी भाजपाने केली होती.
दरम्यान शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आपण उद्या म्हणजेच ३० जून रोजी मुंबईत येत असल्याची घोषणा केलीय. गुवाहाटीमध्ये वास्तव्यास असलेल्या बंडखोर आमदारांचं नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. शिंदे यांनी देवदर्शनानंतर आपण उद्या मुंबईत येऊन बहुमत चाचणीसाठी हजर राहणार असल्याची घोषणा केलीय.
तर, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपा आणि राज्यपालांवर टीका केली आहे. ते म्हणाले, “१२ राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी अडीच वर्षांपासून प्रलंबित आहे. पण राज्यपाल याच क्षणाची वाट पाहात होते. आमच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. ११ तारखेपर्यंत त्यावर निर्णय होणार नाही. यादरम्यान असं काही घडलं, तर सर्वोच्च न्यायालयाने दाद मागण्याची मुभा दिली आहे. अशात राजभवन आणि भाजपा मिळून संविधानाच्या चिंधड्या उडवत असेल, तर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाला त्यात हस्तक्षेप करावा लागेल. आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहोत”, असं सांगत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपा आणि राज्यपालांवर देखील टीका केली आहे.















