- प्रयत्न व कष्टातूनच यशस्वी होता येते…..पी. व्ही. कुलकर्णी
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ फेब्रु) :- प्रचलित शिक्षण पध्दतीतील त्रृटी दुर करुन बेरोजगारी मिटविण्यासाठी विद्यार्थी केंद्रबिंदू मानुन अभ्यासक्रमांची रचना केली पाहिजे. व्यावसायिक अभ्यासक्रमांबाबत देशहित व सर्व समावेशकता याबाबींचा प्राधान्याने विचार व्हायला पाहिजे. यश अपयश ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. प्रत्येकाची यशाची व्याख्या वेगळी असते. आपल्या कुवतीप्रमाणे प्रयत्न करुन क्षमता वाढवावी. प्रयत्न व कष्टातूनच यशस्वी होता येते, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव पी. व्ही. कुलकर्णी यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय व संशोधन केंद्र (पीसीसीओईआर) महाविद्यालयात पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा पदवीग्रहण समारंभ बुधवारी (दि. १३) रोजी संपन्न झाला. यावेळी सहकार विभागाचे सहाय्यक निबंधक संजयकुमार भोसले, पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, सचिव व्ही. एस. काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त भाईजान काझी, पीसीसीआईआरचे प्राचार्य डॉ. हरिष तिवारी, पीसीसीओईचे प्राचार्य डॉ. ए.एम.फुलंबरकर, प्लेसमेंट विभागाचे डीन प्रा. डॉ. शितलकुमार रवंदळे आदी उपस्थित होते. यावेळी विविध शाखेतील सुमारे 256 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. तर प्रशांत माळवी, वसिम शेख, प्रियांका पाटील, ओंकार लडकत, श्याम येसने, प्रिया मिश्रा, श्रुती सुब्रमण्यम् या विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात आला.
पी. व्ही. कुलकर्णी म्हणाले की, पदवीप्रदान समारंभ हा संस्काराचा भाग आहे. यातूनच देशात सुजाण नागरिक तयार होणार आहेत. समाजामध्ये व्यक्तीपुजा व उत्सवांचे बाजारीकरण हे सामाजिक प्रश्न वाढत आहेत. विद्यार्थ्यांनी सामाजिक भान जपत देशहित डोळ्यापुढे ठेवून कार्य करावे, असे कुलकर्णी यांनी सांगितले.
संजयकुमार भोसले मार्गदर्शन करताना म्हणाले की, पदवी मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रचंड कष्ट केलेले असतात. पदवीग्रहण केल्यानंतर विद्यार्थ्यांचा ख-या अर्थाने भौतिक जगतात प्रवेश होतो. यानंतर काही नोकरी करतात त्यातून उत्पन्न मिळते परंतु, नवनिर्मितीचा आनंद घ्यायचा असेल तर उद्योजक झाले पाहिजे असे भोसले यांनी सांगितले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव व्ही.एस. काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्राचार्य ए.एम. फुलंबरकर, विश्वस्त भाईजान काझी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक प्राचार्य हरिष तिवारी, सुत्रसंचालन प्रा. मानसी कुरकुरे, स्वागत प्रा. निधी खरे, आभार प्रा. रमेश राठोड यांनी मानले.











